मुंबई - केंद्र सरकारने लष्कराच्या मदतीने काश्मीरमधील परिस्थितीवर मोठया प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. काश्मीर खो-यातील हिंसाचाराच्या घटना संपल्यात जमा आहेत. पाकिस्तानचा काश्मीरमधील प्रभावही ओसरला आहे. एकूणच काश्मीरची विस्कटलेली घडी रुळावर येताना दिसत आहे. पण त्याचवेळी देशातील अन्य राज्यांनी सर्तक रहाणे आवश्यक आहे. कारण दहशतवादी संघटना आपले उपद्रव मुल्य दाखवून देण्यासाठी भारतातील अन्य राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करु शकतात.
इंडिया टुडेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सध्या विधानसभा निवडणुका होत असलेल्या गुजरातमध्ये सुरक्षा यंत्रणा प्रचंड सर्तक आहेत. गुजरातची सीमा पाकिस्तानला लागून आहे. गुप्तचर यंत्रणांचे गुजरातमध्ये बारीक लक्ष आहे. यापूर्वी काश्मीर खो-यात दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना स्थानिकांकडून मोठया प्रमाणावर पाठबळ मिळत होते. त्यामध्ये मोठया प्रमाणावर घट झाली आहे. सरकारने काश्मीरमधल्या परिस्थितीचे विश्लेषण केले त्यातून ही माहिती समोर आली आहे.
सप्टेंबर 2016 मध्ये उरी येथील लष्करी मुख्यालयावर केलेला हल्ला सोडल्यास दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये कुठलीही मोठी कारवाई करता आलेली नाही. सर्तक असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे पार मोडून टाकले आहे. उरी येथील हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते.
2017 या वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांनी 202 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. काश्मीरमधील पाकिस्तानचा प्रभाव संपवल्याने पाकिस्तान दहशतवादी गटांना हाताशी धरुन भारताच्या अन्य भागात घातपाती कारवाया घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा सर्तक आहेत.