नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी किर्गिस्तानच्या बिश्केक याठिकाणी संघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन(SCO) च्या शिखर संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. 13 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी बिश्केकला रवाना होतील. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करत बिश्केकला जातील. यासाठी पाकिस्ताननेही नरेंद्र मोदी यांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून जाण्यासाठी परवानगी दिली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी भारताने पाकिस्ताच्या बालकोट भागावर एअर स्ट्राईक केला होता. तेव्हापासून पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्राच्या हद्दीतील उड्डाण बंद केली होती. जवळपास 3 महिने झाले तरी पाकिस्तानने अद्याप त्यांच्या हवाई क्षेत्रातील 2 मार्ग खुले केले आहेत. हे दोन्हीही मार्ग दक्षिण पाकिस्तानहून जातात. पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र 11 भागात विभागलं आहे. भारताने पाकिस्तानला आग्रह केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिश्केक दौऱ्यासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी द्यावी.
केंद्राच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती देताना सांगितले की, पाकिस्तानने प्राथमिकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिश्केक दौऱ्यासाठी त्यांचे हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिली आहे. याआधीही तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासाठी पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी दिली होती.
तर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही औपचारिकता पूर्ण केल्यानंतर भारत सरकारला परवानगीबाबत कळवलं जाईल. त्यानंतर सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीला आदेश देण्यात येतील. तसेच येणाऱ्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी हे सकारात्मक पाऊल ठरेल.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये दोन्ही देशांमध्ये काश्मीरसह अन्य राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्याची विनंती केली होती. मात्र भारताने अद्याप इमरान खान यांच्या पत्राला उत्तर दिलं नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करणार नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही अशी भूमिका भारताने घेतली आहे.