नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, असे असताना सुद्धा पाकिस्तानच्याभारताविरोधात नापाक हरकती सुरुच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यासाठी हवाई हद्दीची परवानगी मिळावी यासाठी भारताने केलेली विनंती पाकिस्तानकडून नाकारण्यात आली आहे.
पाकिस्तान मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी रविवारी सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यासाठी त्यांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीची परवानगी मिळावी, यासाठी विनंती करण्यात आली होती. मात्र, भारताची ही विनंती फेटाळण्यात आली आहे."
पाकिस्ताने याआधीही पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी हवाई हद्दीची परवानगी नाकारली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याने भारताकडून पाकिस्तानला या दौऱ्यासाठी हवाई हद्दीची परवानगी मिळण्यासाठी रितसर विनंती करण्यात आली होती. मात्र पाकिस्तानने भारताची ही विनंती फेटाळत नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी पाकिस्तानचा हवाई मार्ग खुला करण्यास नकार दर्शविला होता.दरम्यान, सौदी अरेबियात 29 ऑक्टोबरला होणाऱ्या एका संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सुद्धा या संमेलनात भाग घेण्यासाठी 28 ऑक्टोबरला सौदी अरेबियाला जाणार आहेत.
मोदींनी तुर्कीचा दौरा केला होता रद्दकाश्मीर प्रकरणात तुर्कस्तानला पाकिस्तानचे समर्थन करणे महागात पडले होते. भारताने तुर्कीला कडक इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवसांचा दौरा रद्द केला होता. तुर्कीच्या राष्ट्रपतींनी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांत काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानचं समर्थन करत भारताचा विरोध केला होता. एवढ्यावर न थांबता पॅरिसमध्ये झालेल्या आर्थिक परिस्थिती सोडवणाऱ्या कृती दला(Financial action task force)च्या बैठकीतही तुर्कस्तानने पाकिस्तानचे समर्थन केले होते.