नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर खोऱ्यातील हिंसक घटनांना पाकिस्तान जबाबदार असून, काश्मीरमधील दहशतवादामागे पाकिस्तानच आहे. असा थेट आरोप करीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अगदी परखड शब्दांत सांगितले की, पाकिस्तान सातत्याने भारताला अस्थिर करण्याचे प्रयत्न करीत आहे. तथापि, भारतापुढे आव्हान असेल तेव्हा सर्व जण आपसांतील मतभेद सारून या आव्हानांचा कणखरपणे मुकाबला करतील, असा विश्वासही त्यांनी लोकसभेत व्यक्त केला.जम्मू-काश्मीरवरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तान आपले अपयश आणि दहशतवादी कारवायांवर पांघरूण टाकण्यासाठी असले उद्योग करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. धर्माच्या नावाने वेगळे झालेला पाकिस्तान सातत्याने भारताला अस्थिर करण्याचे कटकारस्थान करीत आहे. इकडे काश्मीर हिंसाचाराने धुमसत असताना पंतप्रधान मोदी मात्र विदेशात सैर करीत होते. हा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. पंतप्रधान सातत्याने माझ्याशी संपर्क राखून होते. विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर लागलीच त्यांनी काश्मीरवर बैठक बोलावली होती. तथापि, तेथील परिस्थिती कोणा एकाला ठीक करता येणार नाही. त्यासाठी त्यांनी सर्व पक्षांचे सहकार्यही मागितले.>‘पेलेट गन’ला पर्याय शोधूजमावाला पांगविण्यासाठी ‘पेलेट गन’चा वापर केल्यावरून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री म्हणाले की, प्राणघातक ठरणार नाही, अशा शस्त्राचा पहिल्यांदा वापर केला पाहिजे होता. ‘पेलेट गन’ला पर्याय शोधला जाईल. त्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. ही समिती दोन महिन्यांत अहवाल देईल.
भारताला अस्थिर करण्याचा पाकचा डाव
By admin | Published: July 22, 2016 4:28 AM