ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू असतानाच आता या तणावाचा परिणाम दोन्ही देशांमधील व्यापारावर होताना दिसत असून, भारताबरोबरचा व्यापार थांबण्याचा विचार पाकिस्तान करत असल्याचे वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिले आहे.
दोन्ही देशांमधील सध्याचे तणावाचे वातावरण पाहता भारतासोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो, असे पाकिस्तानच्या मुख्य औद्योगिक संघनेने सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तान चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि उद्योग संघटनेच्या समुहाचे अध्यक्ष अब्दुल रौफ आलम म्हणाले, "उपखंडातील तणावाचे वातावरण पाहता पाकिस्तानी व्यपार समूह कुठलाही निर्णय एकत्रितपणे घेऊ शकतात. तसेच सध्याची स्थिती पाहता भारतासोबतचा व्यापार सुरू ठेवणे योग्य नाही."
मात्र पाकिस्तानी व्यापाऱ्यांनी दिलेल्या या धमकीमुळे भारतावर परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण दोन्ही देशांमधील व्यापार हा भारताच्या एकूण जागतिक व्यापाराच्या अर्ध्या टक्क्याहून कमी आहे. "भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा व्यापार हा भारताच्या एकूण जागतिक व्यापाराच्या अर्ध्या टक्क्याहून कमी आहे," असे असोचेमचे महासचिव डी. एस. रावत यांनी म्हटले आहे.