नवी दिल्लीः पाकिस्तान क्रिकेट संघाला 'अच्छे दिन' दाखवणारा माजी क्रिकेटपटू इम्रान खान आता या देशाचा पंतप्रधान होण्याच्या दिशेनं कूच करतोय. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी जसजशी पुढे सरकतेय, तसतसा इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ हा पक्ष वरचढ होत चाललाय. पाकिस्तानात पीटीआयची सत्ता येणं, इम्रान खान यांनी पंतप्रधान होणं हे भारतासाठी तापदायक असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. विशेषतः इम्रान खान यांची 'तालिबान खान' ही प्रतिमा पाहता, येत्या काळात भारताची डोकेदुखी वाढू शकते, असं बोललं जातंय.
पाकिस्तान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, इम्रान खान यांनी केलेली भाषणं ऐकल्यास त्यांच्या भारताबद्दलच्या भूमिकेचा स्पष्ट अंदाज येऊ शकतो. पाकिस्तानी सैन्याचा आणि आयएसआयचा वापर करून इम्रान खान गैरमार्गाने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करताहेत, असा आरोप नवाज शरीफ यांच्या पक्षाने केला होता. त्यावर इम्रान खान यांनी वेगळाच बाउन्सर टाकला होता.
भारताला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवाज शरीफ प्यारे आहेत, पण ते आपल्या सैन्याचा तिरस्कार करतात. मी पंतप्रधान झालो, तर पाकिस्तानसाठी काम करेन, अशी भीती शरीफना वाटतेय, असं सांगत त्यांनी भारतविरोधाचा मुद्दा तीव्र केला होता. नवाज शरीफ हे आधुनिक मीर जाफर असल्याचा हल्ला इम्रान खान यांनी चढवला होता. काश्मीरमधील हिंसाचाराला सर्वस्वी भारतच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी प्रचारात केला होता. तसंच, सर्जिकल स्ट्राइकनंतर त्यांनी भारताला अद्दल घडवण्याची भाषाही केली होती. मोदींना कसं प्रत्युत्तर द्यायचं हे मी नवाज शरीफांना सांगेन, असं तिखट ट्विट त्यांनी केलं होतं. त्यामुळे आता इम्रान खान पंतप्रधान झाल्यावर भारत-पाकमधील दरी आणखी वाढण्याची भीती आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांना वाटतेय.
इम्रान खान यांना कोण, का म्हणतं 'तालिबान खान'?
पाकिस्तानातील उदारमतवाद्यांच्या वर्गात इम्रान खान यांची वेगळी ओळख आहे आणि ती म्हणजे, तालिबान खान. त्याचं कारण आहे, इम्रान खान यांनी केलेला तालिबानी दहशतवाद्याचा गौरव. २०१३ मध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चा कमांडर वली-उर-रहमान अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला होता. त्याला इम्रान खान यांनी 'शांती समर्थक' अशी उपाधी दिली होती. इतकंच नव्हे तर, गेल्या वर्षी हक्कानी मदरशाला ३० लाख डॉलर्सची मदत देऊन पश्चिम प्रांत खैबर पख्तुनख्वा येथील सरकारने सगळ्यांनाच धक्का दिला होता. या सरकारमध्ये इम्रान खान यांचा पक्षही सहभागी आहे. त्यामुळेच, इम्रान खान यांच्या हातात सत्ता गेल्यास कट्टरपंथीयांचं फावेल आणि भारताला धोका वाढेल, याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं.