Arvind Kejriwal Bail, Pakistan Fawad Chaudhry: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नुकताच मोठा दिलासा मिळाला. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. पण, त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे. हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांच्यापुढे काही अटीदेखील ठेवल्या आहेत. ४९ दिवस तुरुंगात काढल्यानंतर केजरीवाल बाहेर आले आहेत. केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका होताच पाकिस्तानचे माजी माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनीही त्यांच्या सुटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
फवाद चौधरी यांनी केजरीवाल यांचा जामीन हा नरेंद्र मोदींचा मोठा पराभव असल्याचे वर्णन केले आहे. तसेच हा निर्णय उदारमतवादी भारतीयांसाठी लाभदायक आहे असे म्हणत त्यानी अभिनंदनही केले. फवाद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले की, पीएम मोदी आणखी एक लढाई हरले, केजरीवालांना कोर्टाने सोडलं, उदारमतवादी भारतासाठी चांगली बातमी."
दरम्यान, दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. यापूर्वी ईडीने त्यांना या प्रकरणात चौकशीसाठी 9 समन्स बजावले होते. मात्र, केजरीवाल कोणत्याही समन्सवर हजर झाले नाहीत. ते या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आणि मद्य व्यापाऱ्यांकडून लाच मागण्यात त्यांचा थेट सहभाग होता, असा केंद्रीय तपास यंत्रणेचा आरोप आहे.
केजरीवालांना सशर्त जामीन, अटी कोणत्या?
अरविंद केजरीवालांना 50 रुपयांचा बाँड आणि तेवढीच रक्कम तुरुंग अधीक्षकांकडे जमा करावी लागेल. जामीन काळात केजरीवालांना त्यांच्यावरील प्रकरणाबाबत कोणतेही भाष्य करता येणार नाही. या प्रकरणातील कोणत्याही साक्षीदाराला भेटू किंवा बोलू शकणार नाहीत. त्यांना मुख्यमंत्री कार्यालय किंवा दिल्ली सचिवालयात जाता येणार नाहीत. नायब राज्यपालांची परवानगी मिळाल्यानंतरच अधिकृत फाइल्सवर स्वाक्षरी करतील. या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही अधिकृत फाईल पाहता येणार नाहीत. केजरीवालांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागेल.