ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - आंतरराष्ट्रीय कोर्ट त्यापाठोपाठ नियंत्रण रेषेवर भारताकडून मात खाल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली आहे. नियंत्रण रेषेजवळ संयुक्त राष्ट्रांच्या वाहनावर भारतीय सैन्याने गोळीबार केल्याचा पाकिस्तानचा दावा संयुक्त राष्ट्रांनीच फेटाळून लावला आहे. त्यामुळे खोटेपणा करणारा पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे.
खंजर सेक्टरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांच्या वाहनाला भारतीय सैन्याने लक्ष्य केल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले होते. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगच्या हवाल्याने त्यांनी ही बातमी दिली होती. संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांना लक्ष्य करुन भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्ताननेही लगेचच या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले अशी बातमी पाकिस्तानी माध्यमांमध्ये सुरु होती.
त्यावर बुधवारी रात्री संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्याने पत्रकारपरिषद घेऊन या बातमीचे खंडन केले. प्रत्यक्षात असे काही घडले नसल्याचे त्यांनी सांगितले. भीमबेर जिल्ह्यात संयुक्त राष्ट्राचे निरीक्षक गेले होते. त्यावेळी पाकिस्तानी लष्कराची वाहनेसुद्धा सोबत होती. यावेळी परिसरात गोळीबाराचे आवाज ऐकू आले. खास संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधींना लक्ष्य करण्याच्या हेतूने हा गोळीबार झाल्याचा कुठलाही पुरावा नाही. कोणीही या गोळीबारात जखमी झालेले नाही असे संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्याने सांगितले. संयुक्त राष्ट्राच्या या खुलाशामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे.
भारतीय सैन्याने मंगळवारी दुपारी नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडीओ सार्वजनिक केल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट सुरु आहे. भारतासमोर नाचक्की झाल्याने पाकिस्तानने खोटा कांगावा सुरु केला आहे. काल पाकिस्तानी वायू दलाच्या विमानांनी सियाचीनमध्ये भारतीय सीमेजवळून उड्डाण करुन कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तसेच आपणही भारतीय चौक्या कशा नष्ट केल्या त्याचा बनावट व्हिडीओ जारी केला. एकूणच पाकिस्तानच्या या सर्व कृती त्यांची अस्वस्थतता दाखवून देणा-या आहेत.
संबंध बिघडण्याची शक्यता
भारतीय लष्कराने पाक चौक्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे पाडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा विचार भारत करत आहे, अशी माहिती संरक्षण गुप्तचर विभागाचे संचालक ले. जनरल विन्सेंट स्टिवॉर्ट यांनी दिली.
भारतीय लष्कराने पाक चौक्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे पाडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा विचार भारत करत आहे, अशी माहिती संरक्षण गुप्तचर विभागाचे संचालक ले. जनरल विन्सेंट स्टिवॉर्ट यांनी दिली.