मेंढर : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पाकिस्तान घाबरताे. त्यामुळेच जम्मू-काश्मीर सीमेवर शांतता आहे. भारत ताेडीस ताेड प्रत्युत्तर देईल, हे जाणून असल्यामुळेच पाकिस्तान गाेळीबार करण्यास धजावणार नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. विधानसभा निवडणुकीसाठी शाह यांनी मेंढर, थानामंडी, राजाैरी, पुंछ आणि अखनूर येथे प्रचारसभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी पाक पुरस्कृत दहशतवादावर टीकास्त्र साेडताना सांगितले की, केंद्र सरकारने तरुणांच्या हातात बंदुका-दगडांऐवजी लॅपटाॅप देत दहशतवादाचा बिमाेड केला. सरकार जम्मूच्या पर्वतरांगांमध्ये बंदुकांचा आवाज येऊ देणार नाही. लाेकांच्या सुरक्षेसाठी सीमेजवळ आणखी बंकर बनवू. मी १९९० च्या दशकात सीमेपलीकडून हाेणाऱ्या गाेळीबाराची आठवण करून देऊ इच्छिताे.
देशाला त्यांचा अभिमान...
शाह म्हणाले की, १९४७ मध्ये देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या गुज्जर आणि बक्करवाल समुदायावर देशाला अभिमान आहे. दहशतवाद फाेफावला त्यावेळी यांनीच शत्रूच्या गाेळ्या छातीवर झेलल्या. पहाडी, गुज्जर आणि बक्करवाल समुदायांना केवळ नाेकरीतच नव्हे तर पदाेन्नतीमध्येही आरक्षण देण्याचा भाजपने निर्णय घेतला आहे, असे शाह यावेळी म्हणाले.
‘फारुख यांनीच दहशतवाद आणला’
शाह यांनी नॅशनल काॅन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस या तीन पक्षांवर काश्मीरमध्ये दहशतवाद वाढण्यासाठी दाेषी ठरविले.
९० च्या दशकात फारुख यांच्याच आशीर्वादाने दहशतवाद फाेफावला. त्यावेळी प्रचंड गाेळीबार व्हायचा.
९० च्या दशकापासून २०१४ पर्यंत तिन्ही घराण्यांनी दहशतवाद पसरविला. त्यात ४० हजार तरुणांचा मृत्यू झाला, असा आराेप त्यांनी केला.
तोवर चर्चा नाहीच...
पूर्वीचे शासक पाकिस्तानला घाबरत हाेते. मात्र, आज पाकिस्तान माेदींना घाबरताे. ताे गाेळीबार करण्याची हिम्मत करणार नाही, असे शाह म्हणाले. दहशतवाद थांबविणार नाही, ताेपर्यंत पाकिस्तानसाेबत काेणतीही चर्चा हाेणार नाही, असेही ते म्हणाले.