ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10- आश्चर्यकारकपणे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आणि त्यासोबतच पाकिस्तानच्या चिंता वाढायला लागल्या आहेत. ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकेचं पाकिस्तानबद्दल धोरण बदलेल आणि त्यांचा भारताच्या बाजुने झुकाव वाढेल असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
मुस्लिमांना अमेरिकेमध्ये प्रवेशबंदी करावी असं ट्रम्प पुर्वी म्हणाले होते तर भारतात त्यांचे असलेल्या व्यावसायिक संबंधांमुळे नवी दिल्लीच्या दिशेने त्यांचा झुकाव वाढेल आणि पाकिस्तानबाबत ते कठोर भूमिका ठेवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका पाकिस्तानला पुर्णतः वा-यावर सोडणार नाही मात्र त्यांचा कल हा भारताकडे निश्चित जास्त असेल, हिलरी क्लिंटन यांच्याशी तुलना केली तर ट्रम्प हे पाकिस्तानसाठी जास्त कठोर असतील असं लाहोर येथील परराष्ट्र धोरण विश्लेषक हसन अस्कारी रिझवी म्हणाले.
ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक कॅम्पेनमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतूक केलं होतं आणि स्वतः हिंदूचा चाहता असल्याचं म्हटलं होतं. तसंच मोदींप्रमाणे त्यांनी अब की बार ट्रम्प सरकार असा नाराही दिला होता. तसंच भारताच्या 8 टक्के विकासाच्या गतीचा उल्लेख करताना भारताच्या तुलनेत अमेरिकेचा विकास केवळ 3 टक्के होत अशल्याचं म्हणत चिंता व्यक्त केली होती.
तर, आपल्या निवडणूक मोहिमेच्या सुरूवातीला पाकिस्तान हा सर्वात खतरनाक देश आहे असं ट्रम्प म्हणाल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलं होतं. 9/11 नंतर पाकिस्तानने अनेकदा धोका दिला असंही ते म्हणाले होते. राष्ट्रपती झाल्यावर पाकिस्तानला प्रत्येक चुकीसाठी शिक्षा देईल असं ते म्हणाल्याचंही वृत्त आलं होतं. शिवाय भारतात ट्रम्प यांचा असलेला व्यवसाय अधिक सुरक्षित करण्यासाठी ते पाकिस्तानबाबत कठोर पावलं उचलू शकतात अशी शक्यता पाकिस्तानातूनच वर्तवली जात असून त्यामुळे पाकिस्तानच्या पोटात गोळा आला आहे.