जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या सांबा जिल्ह्यात काही गावे आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) नऊ चौक्यांवर शुक्रवारी रात्रभर तुफान गोळीबार व उखळी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात दोन मजूर जखमी झाले. पाकी सैनिकांनी सांबा सेक्टरमध्ये बसंतर व त्रेवा नदीदरम्यान बीएसएफच्या नऊ चौक्यांवर सुरू केलेल्या गोळीबारास सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले. काही ठिकाणी उखळी तोफाही डागण्यात आल्या. ही चकमक रात्री २.२० वाजेपर्यंत सुरू होती.दहशतवादी हल्ला टळलासुरक्षा दलाने राजौरी जिल्ह्यातील एका वर्दळीच्या मार्गालगत असलेल्या भूमिगत नाल्यातून डिटोनेटर्ससह २ किलो स्फोटके जप्त करून दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट उधळून लावला. संरक्षण प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, एस आॅफ स्पेड्स विभागाच्या सतर्क जवानांनी शुक्रवारी मार्ग खुला करीत असताना छातियारी गावाजवळ भूमिगत नाल्यातून संशयास्पद बॅग जप्त केली. त्यानंतर तातडीने या क्षेत्राला घेराव घालण्यात आला. आणि येथून ५ डिटोनेटर्ससह सुमारे २ किलो स्फोटके ताब्यात घेण्यात आली. जम्मू-राजौरी-पुंछ मार्गाच्या साफसफाईसाठी संपूर्ण क्षेत्राची झडती घेण्यात आली होती.
सीमेवर पाकचा गोळीबार
By admin | Published: October 25, 2015 4:28 AM