श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. सीमारेषेवर अद्यापही पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत आहेत. पाकिस्तानकडून कठुआ वगळता सर्वच परिसरात गोळीबार करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वारंवार होणा-या गोळीबारामुळे आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीमारेषा परिसरात राहणा-या नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. शुक्रवारी ( 19 जानेवारी ) रात्रीपासून पाकिस्तानकडून 30 भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. प्रत्युत्तराच्या कारवाईत 8 पाकिस्तानी नागरिक आणि रेजर्सं मारले गेले आहेत. प्रत्युत्तराच्या कारवाईत भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैनिकांच्या कित्येक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.
BSFच्या 35 चौक्या पाकिस्तानच्या निशाण्यावर सीमारेषेवर पाकिस्ताननं बीएसएफच्या 35 चौक्यांना टार्गेट केले आहे. पाकिस्तानी रेंजर्सकडून भारतीय जवान आणि नागरिकांवर उखळी तोफांचा मारा करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री (19 जानेवारी) पाकिस्ताननं अरनिया, सुचेतगड, आरएस पुरा, पर्गवाल, अखनूर परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला.
8 पाकिस्तानी रेंजर्स ठार प्रत्युत्तराच्या कारवाईत भारतीय सेनेनं सांबा, आरएसपुरा आणि हीरानगर सेक्टर परिसरात पाकिस्तानचं प्रचंड नुकसान केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमारेषे पलिकडे शकरगड आणि सियालकोट परिसरात आठ पाकिस्तानी नागरिक आणि रेंजर्स मारले गेले आहेत.
भारताच्या ४० चौक्यांवर पाकने केला गोळीबार, एक जवान शहीद; २ स्थानिकांचाही मृत्यू
दरम्यान, जम्मूतील तीन जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय सीमांवरील पाच सेक्टरवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून शुक्रवारी (19 जानेवारी) केलेल्या उखळी तोफगोळ्यांच्या मा-यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला तर दोन स्थानिक मरण पावले. पाकच्या या आगळीकीला भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी भारताच्या ४0 चौक्यांवर गोळीबार केला. त्यामुळे तेथील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या असून, लोकांना घराबाहेर न पडण्याचे तसेच शक्यतो तेथून स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जम्मू, सांबा, कठुआ या तीन जिल्ह्यांच्या सीमाभागात पाकने आगळीक केली आहे. राजौरी जिल्ह्यातही सकाळपासून पाकिस्तानी सैनिकांनी उखळी तोफांचा मारा सुरू केला. बीएसएफच्या तीन चौक्यांना पाकिस्तानी सैनिकांनी लक्ष्य केले आहे. त्यात बीएसएफचे हेडकॉन्स्टेबल जगपाल सिंग हे शहीद झाले, तर दोन जवानही जखमी झाले.
अन्य दोन स्थानिकही मरण पावले. पाकच्या हल्ल्यांत कठुआ जिल्ह्यात नऊ, जम्मू जिल्ह्यातील आठ व सांबा जिल्ह्यातील चार असे २३ जण जखमी झाले असून त्यातील १३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वत: शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाºया पाकिस्तानने प्रत्यक्षात भारताकडून आमच्यावर गोळीबार सुरू आहे, असा कांगावा सुरू केला आहे. भारताच्या माºयात पाकिस्तानी नागरिक ठार झाले आहेत, असा कांगावा करून भारताचे पाकिस्तानातील उपउच्चायुक्त जे. पी. सिंग यांना बोलावून घेण्यात आले. गेल्या दोन दिवसांत जे.पी. सिंग यांना दोनदा बोलावण्यात आले आहे.
चोख प्रत्युत्तर देऊ - सुभाष भामरेपाकिस्तानला कशा प्रकारे चोख प्रत्युत्तर द्यायचे, हे भारतीय लष्कराला व्यवस्थित ठाऊक आहे व त्यासाठी लष्कर संपूर्ण सज्ज आहे, असेकेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी म्हटले आहे. सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रकारही घडत असून ते रोखण्यात येतील असेही ते पुढे म्हणाले.