श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागामध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सातत्याने गोळीबार चालविला आहे. त्यामुळे उरी भागातल्या अनेक गावांतील रहिवासी आपले घरदार सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रयाला गेले आहेत.पोलीस सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कराने सोमवारपासूनच चुरांडा, बटगढ, बालकोट व सिलिकोट परिसरातील गावांना लक्ष्य करून गोळीबार चालविला आहे. त्यामुळे नियंत्रण रेषेलगतच्या थाजल व सोनी या गावांतील रहिवासी तर सोमवार रात्रीपासूनच आपले घरदार सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. त्यासाठी त्यांना पोलीस यंत्रणेने मदत केली. या गोळीबारात सीमेलगतच्या गावांमध्ये मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने हे सावधगिरीचे पाऊल उचलण्यात आले आहे. सोमवारी रात्री पाक लष्कराने केलेल्या गोळीबारात उरी भागात तीन नागरिक जखमी झाले होते. सोमवार, बुधवार व शुक्रवारी पाककडून सातत्याने गोळीबार सुरू होता. मात्र काल संध्याकाळपासून तो थांबला आहे.उरी येथे राज्य सरकारतर्फे चालविण्यात येणाºया मुलींच्या शाळेत सध्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली असून, तेथे सीमेलगतच्या गावांतील नागरिकांना हलविण्यात आले आहे. राज्य सरकारने आमचे सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन करावे, अशी मागणी काही जणांनी केली. भारत व पाकिस्तानच्या लष्करामध्ये वारंवार हल्ले-प्रतिहल्ले होत असल्यामुळे आमचे जगणे मुश्कील झाले आहे, असे गुलाम मोहम्मद मीर हा रहिवासी म्हणाला.
पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार; काश्मीरमधील स्थिती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 2:51 AM