जम्मू, दि. 23 - सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानने शनिवारी रात्री जम्मूच्या सांबा आणि पूँछ सेक्टरमध्ये भारतीय चौक्या आणि खेडयांना लक्ष्य केले. पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. यात बीसएफएच्या दोन जवानांसह पाच नागरीक असे एकूण सात जण जखमी झाले.
नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. त्यामुळे सीमेवर राहणा-या शेकडो गावक-यांना अन्यत्र सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला आहे. अर्णिया, आरएसपूरा, आणि रामगड सेक्टरमधल्या गावांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार आणि मोर्टार डागले. त्यांनी 20 पेक्षा जास्त गावांना लक्ष्य केले.
गोळीबारात आरएसपूरा सेक्टरच्या सातोवाली गावातील तीन नागरीक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सांबाच्या रामगड सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले.
पाकिस्तान म्हणजे ‘टेररिस्तान’ दहशतवादाचा उपयोग एक साधन म्हणून करणे थांबवा, असा इशारा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला दिला. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या संयुक्त राष्ट्रातील परमनंट सेक्रेटरी श्रीमती इनाम गंभीर पाकिस्तानचा उल्लेख थेट टेररिस्तान असाच केला. पाकिस्तान म्हणजे दहशतवादाची भूमी आहे. दहशतवाद्यांना ते आपले नंदनवन वा स्वर्गच वाटते. त्या ठिकाणी दहशतवादाची निर्मिती होते आणि जागतिक स्तरावर त्याची निर्यात होते, अशी जहाल टीकाही इनाम गंभीर यांनी केली.
सुषमा स्वराज यांनी दहशतवादाचा मुद्दा अतिशय प्रभावीपणे मांडला. काही देशांच्या मदतीने चालणाºया अतिरेकी संघटनांवर त्यांनी प्रहार केला. देशाचे धोरण म्हणून दहशतवादाचा उपयोग करणे बंद करा, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला. संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या दहशतवादी संघटनांना आश्रय देणे बंद करावे तसेच या संघटनांना पुरविली जाणारी आर्थिक रसद थांबवावी, असेही सुषमा स्वराज म्हणाल्या. संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत सुषमा स्वराज यांनी दहशतवादाशी एकत्रितपणे लढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाचे पोषण करणारी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचाच अंत करण्याची गरज असल्याचे स्वराज म्हणाल्या.