इस्लामाबाद : पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून सुरू असलेली चिथावणीखोर वक्तव्य काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आता पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. पाकचे परराष्ट्र मंत्री असिफ ख्वाजा यांनी टि्वटरवरून ही धमकी दिली आहे. भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांची इच्छा असेल तर आमच्या अण्वस्त्र हल्ल्याचा अनुभव घेऊ शकतात. त्यामुळे त्यांची शंका दूर होईल, इंशाल्लाह,' अशी धमकी असिफ यांनी टि्वटरवरून दिली आहे.
'पाकिस्तानच्या अण्वस्त्र हल्ल्याची धमकी म्हणजे केवळ पोकळ धमकी आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ,' असं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी म्हटलं होतं. रावत यांच्या या वक्तव्यानंतर तिळपापड झालेल्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री असिफ ख्वाजा यांनी टि्वटरवरून 'भारताच्या लष्करप्रमुखांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे. त्यांचं वक्तव्य अण्वस्त्र हल्लाला आमंत्रण देणारं आहे. आम्ही पोकळ धमकी देत नाही रावत यांची इच्छा असेल तर आमच्या अण्वस्त्र हल्ल्याचा अनुभव घेऊ शकतात. त्यामुळे त्यांची शंका दूर होईल, इंशाल्लाह,' अशी धमकी असिफ यांनी टि्वटरवरून दिली.
दुसरीकडे, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनीही ट्विट करून भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे.बिपीन रावत यांनी केलेले वक्तव्य आम्ही सहजपणे घेतलेले नाही हे लक्षात ठेवा. पाकिस्तानबाबत गैरसमज करून घेऊ नका, आमचे रक्षण कसे करायचे हे आम्हाला चांगलं माहिती आहे, असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला आहे.
यापूर्वी सप्टेंबर 2016 मध्ये ख्वाजा आसिफ यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती.