नवी दिल्ली : गुरुनानक यांच्या ५४९ व्या जयंती कार्यक्रमात भाग घेण्यासाठी लाहोरजवळच्या नानकाना साहिबला भेट देण्यासाठी पाकिस्तानने ३,८०० पेक्षा जास्त भारतीयांना व्हिसा दिला आहे. हा कार्यक्रम २१ ते ३० नोव्हेंबरपर्यंत चालेल.पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल महमूद यांनी मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात गेल्या काही वर्षांत शीख भाविकांना एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच व्हिसा दिल्याचे म्हटले. महमूद म्हणाले की, शीख धर्माच्या संस्थापकांशी संबंधित शीख स्थळांना भेट देण्याची इच्छा असलेल्या शीख यात्रेकरूंबाबत ही आमची विशेष भावना आहे.गेल्या जून महिन्यात भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना इस्लामाबादजवळच्या गुरुद्वारा पंजा साहीबमध्ये प्रवेश करण्यास रोखल्याबद्दल वाद निर्माण झाला होता. तथापि, पाकिस्तानने मंगळवारी म्हटले की, सगळ्या पवित्र ठिकाणांचे संवर्धन करण्यास आणि भेटीसाठी येणाऱ्या सर्व धर्मांच्या यात्रेकरूंना सर्व शक्य ते साह्य करण्यास आम्ही बांधील आहोत.
पाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 2:29 AM