ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 - पाकिस्तानकडून वारंवार होणा-या शस्त्रसंधीचं उल्लंघनाला बीएसएफकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. गेल्या 11 दिवसांपासून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. बीएसएफने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत गेल्या 11 दिवसांत 5000 उखळी तोफांचा मारा केला असून 35,000 हून जास्त गोळ्या चालवल्या आहेत.
बीएसएफने पाकिस्तानला उत्तर देताना 3000 लाँग रेंज तर 2000 शॉर्ट रेंजच्या उखळी तोफांचा वापर केला आहे. लाँग रेंज उखळी तोफ 5 ते 6 किमीपर्यंत मारा करु शकते तर शॉर्ट रेंजच्या उखळी तोफेची क्षमता 900 मीटरपर्यंतची आहे. याव्यतिरिक्त बीएसएफने एमएमजी (Medium Machine Gun), एलएमजी (Light Machine Gun) आणि रायफल्सचा वापर करत 35 हजाराहून जास्त गोळ्या झाडल्या आहेत.
जम्मू सेक्टरमध्ये सर्वात जास्त शस्त्रसंधी उल्लंघन केलं जात आहे. पाकिस्तानी रेंजर्स रात्रीच्या वेळी फायरिंग करत आहेत.
दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानकडून कव्हर फायरिंग केली जात आहे अशी माहिती बीएसएफने दिली आहे. बीएसएफने प्रत्युत्तर देत केलेल्या कारवाईत आतापर्यत 15 पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
19 ऑक्टोबरनंतर पाकिस्तानकडून वारंवार सुरु असणा-या फायरिंगमध्ये बीएसएफचे तीन जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानने गेल्या 11 दिवसांत आंतरराष्ट्रीय सीमेवर 60 हून अधिक वेळा शस्रसंधी उल्लंघन केलं आहे.