ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. २२ - उरी येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानात प्रचंड अस्वस्थतता आहे. पाकव्याप्त काश्मीरला भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने लक्ष्य करण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानने तिथे प्रवासी विमानांची उड्डाणे बंद केल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
गोंधळलेला पाकिस्तान स्वत:च युद्ध सराव करुन आपले नुकसान करत आहे. बुधवारी पाकिस्तानात लढाऊ विमानांनी युद्ध सराव केला पण याचा सकारात्मकऐवजी उलट नकारात्मक परिणाम झाला. या सरावामुळे पाकिस्तानी शेअर बाजार कोसळला. अशा प्रकराचे सराव करुन पाकिस्तान स्वत:च युद्धाच्या शक्यतेला हवा देत आहे.
भारताकडून संभाव्य कारवाईच्या शक्यतेमुळे पाकिस्तानी सीमेवर अधिक सर्तकता असल्याचे डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाकडून हल्ले केले जाण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवासी विमानांची उड्डाणे बंद करण्याची अधिकृत घोषणा बुधवारी केली.