नवी दिल्ली - पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना भेटण्याची त्यांच्या कुटुंबियांना परवानगी दिली आहे. पण कुटुंबियांच्या सुरक्षिततेसंबंधी अद्यापपर्यंत कोणतेही आश्वासन दिलेले नाही. भारताने पाकिस्तानकडे कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईच्या सुरक्षिततेची हमी मागितली आहे. भारताने यासंबंधी पाठवलेल्या पत्राला पाकिस्तानने अद्यापपर्यंत कोणतेही उत्तर दिलेले नाही.
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली. पाकिस्तानने फक्त कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला त्यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. पण सासूबाईंना म्हणजे कुलभूषण यांच्या आईलाही परवानगी द्यावी अशी त्यांच्या पत्नीची इच्छा आहे. पाकिस्तानचा इतिहास लक्षात भारत या भेटीआधी बरीच सतर्कता आणि काळजी घेत आहे. भारताने पाकिस्तानकडे कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईच्या सुरक्षेची हमी मागितली आहे.
पाकिस्तानात आल्यानंतर दोघींची कुठलीही चौकशी करु नये किंवा त्यांना त्रास देऊ नये अशी मागणी भारताने केली आहे तसेच तुरुंगात कुलभूषण यांना भेटण्याच्यावेळी पत्नीसोबत राजनैतिक अधिका-यालाही जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भारताने केली आहे. मानवीय दृष्टीकोनातून कुलभूषण यांना भेटण्याची त्यांच्या पत्नीला परवानगी देत आहोत असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे.
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सध्या एससीओ देशांच्या परिषदेसाठी रशियात सोची येथे गेल्या आहेत. तिथे त्यांची पाकिस्तानी पंतप्रधान खाकन अब्बासी यांच्याशी भेट होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. खाकन अब्बासी सुद्धा या परिषदेसाठी रशियामध्ये आहेत. कुलभूषण जाधव पाकिस्तानी तुरुंगात बंद आहेत. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. भारताने या निर्णयाला आंतरराष्ट्रीय कोर्टात आव्हान दिले आहे. सध्या हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात आहे. भारताने कुलभूषण जाधव यांच्या विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव निर्माण केल्यामुळे पाकिस्तानला कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्याचा निर्णय घ्यावा लागला.