नवी दिल्ली : पाकिस्तानने कर्तारपूर कॉरिडोर उद्घाटन सोहळ्यासाठी पंजाबचे माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांना आमंत्रण पाठवले आहे. दरम्यान, या वृत्ताला नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही आमंत्रण पाठवले होते. त्यांनी हे आमंत्रण स्वीकारले नाही. मात्र, त्यावेळी मनमोहन सिंग यांनी म्हटले होते की, विशेष अतिथी म्हणून नव्हे, तर सामान्य व्यक्ती म्हणून या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पार्टीच्यावतीने नवज्योत सिंग सिद्धू यांना कर्तारपूर कॉरिडोर उद्घाटन सोहळ्यात सामील होण्यासाठी आमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानचे खासदार फैसल जावेद यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या आदेशानुसार नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी टेलिफोनवरून बातचीत केली असून 9 नोव्हेंबरला या सोहळ्यात उपस्थित होण्याचे आमंत्रण दिले आहे.
दरम्यान, भारतातील शीख धर्मीयांसाठी महत्त्वाचा असलेला कर्तारपूर कॉरिडोर 9 नोव्हेंबरला खुला करण्यात येणार आहे. या विशेष कॉरिडोरने कर्तारपूर येथील दरबार साहिब आणि पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील बाबा नानक गुरुद्वाराला जोडले जाणार आहेत. त्याद्वारे भारतीय भाविकांना व्हिसाशिवाय पाकिस्तानातील कर्तारपूरला जाता येणार आहे. त्यासाठी केवळ एक परमिट घ्यावे लागणार आहे. कर्तारपूर साहिब गुरुद्वाराची स्थापना शिखांचे धर्मगुरू गुरूनानक देव यांनी 1522मध्ये केली होती. शीख धर्मीयांचे हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे.