श्रीनगर: जम्मू-काश्मीर अशांत करण्याचा पाकिस्तानचा डाव कधीही यशस्वी ठरणार नाही, असं लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. दहशतवाद्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करून भारत त्या भागाच्या विकासाचं लक्ष्य गाठेल, असंदेखील ते म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानी प्रशासनाच्या नव्हे, तर दहशतवाद्यांच्या नियंत्रणात असल्याचं लष्करप्रमुख रावत यांनी म्हटलं.पाकव्याप्त काश्मीर पूर्णपणे दहशतवाद्यांच्या ताब्यात आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होऊ नये, या भागाचा विकास होऊ नये यासाठी दहशतवाद्यांकडून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातात. त्यामुळेच काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्यांचा जळफळाट झाला, असं लष्करप्रमुख म्हणाले. पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तान जम्मू-काश्मीरचा भाग आहेत. मात्र तो सध्या पश्चिमेकडच्या शेजाऱ्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी या भागावर अवैध कब्जा केला आहे, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. जम्मू-काश्मीरमध्ये पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तानचादेखील समावेश होतो. या भागावर सध्या पाकिस्तानचा अवैध कब्जा आहे. पीओकेतील दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत. ते कधी बाहेरील राज्यांमधून आलेल्या सफरचंदांच्या व्यापाऱ्यांच्या हत्या घडवतात, तर कधी दुकानं उघडू नये यासाठी धमक्या दिल्या जातात. इतकंच काय विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊ नये यासाठीदेखील ते प्रयत्न करतात. दहशतवाद्यांच्या पाठिंब्यानं या सगळ्या कारवाया केल्या जातात, असं लष्करप्रमुख एका कार्यक्रमात म्हणाले.