'पाकिस्तान भाजपासाठी शत्रूराष्ट्र, आमच्यासाठी नाही'; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 09:04 AM2024-02-29T09:04:22+5:302024-02-29T09:05:31+5:30
B K Hariprasad Controversial Statement : पाकिस्तान भाजपासाठी शत्रूराष्ट्र असू शकतं, मात्र काँग्रेस पाकिस्तानकडे केवळ एक शेजारील देश म्हणून पाहतो, असं विधान कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांनी केलं आहे.
कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांनी पाकिस्तानबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानभाजपासाठी शत्रूराष्ट्र असू शकतं, मात्र काँग्रेस पाकिस्तानकडे केवळ एक शेजारील देश म्हणून पाहतो. हरिप्रसाद यांच्या या विधानानंतर भाजपाने त्यांच्याविरोधात देशविरोधी भावना भडकवल्याचा आरोप केला आहे.
कर्नाटक राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला होता. त्याला उत्तर देताना हरिप्रसाद यांनी हे विधान केले आहे. विधान परिषदेमध्ये संबोधित करताना हरिप्रसाद म्हणाले की, भाजपावाले शत्रूराष्ट्रासोबत आमच्या संबंधांबाबत बोलतात. त्यांच्या मते पाकिस्तान एक शत्रूराष्ट्र आहे. मात्र आमच्यासाठी पाकिस्तान कुठलंही शत्रू राष्ट्र नाही आहे. तो केवळ एक शेजारील देश आहे. हल्लीच लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न सन्मान देण्यात आला. हेच अडवाणी जिन्ना यांच्या कबरीला भेट देण्यासाठी गेले होते. तसेच त्यांच्यासारखे कुणी धर्मनिरपेक्ष राष्ट्र नसल्याचे म्हणाले होते. तेव्हा पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र नव्हते का? असा सवालही हरिप्रसाद यांनी विचारला.
कर्नाटक भाजपाने पाकिस्तानला मुस्लिम राष्ट्र न म्हटल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली आहे. पाकिस्तानने भारताविरोधात चार युद्धं लढली आहेत. पाकिस्तानबाबत काँग्रेसचं काय मत आहे ते बी. के. हरिप्रसाद यांनी सभागृहात स्पष्ट केलं आहे. त्यांनी पाकिस्तान भाजपासाठी शत्रूराष्ट्र आणि काँग्रेससाठी एक शेजारी असल्याचं सांगून नेहरू आणि जिन्ना यांच्यातील घनिष्ठ संबंध वर्तमान पिढीपर्यंत कामय असल्याचं दाखवून दिलं आहे, असा आरोप भाजपाने केला.
मंगळवारी राज्यसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेसचे उमेदवार नासिर हुसेन यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या असा आरोप करत त्याविरोधात भाजपाने कर्नाटक विधानसभेत आंदोलन केले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून हरिप्रसाद यांनी वरील वक्तव्य केले होते.