नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना तीन दिवसांनंतर भारताला सोपविण्य़ात आले. मात्र, यासाठीही पाकिस्तानने दोन वेळा सोडण्याची वेळ पुढे ढकलली. याचे कारण पुढे आले आहे. अभिनंदन यांचा जबानीचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना वाघा बॉर्डरवर थांबवून ठेवण्यात आले होते. अभिनंदन यांनी 9 वाजून 21 मिनिटांनी भारतीय भूमीत पाऊल ठेवले. त्यांना तेथून दिल्लीला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर दबाव वाढल्याने अभिनंदन यांना जिनिव्हा करारानुसार भारताकडे सोपवावे लागले. शुक्रवारी सायंकाळी त्यांना भारताकडे सोपविण्यात येणार होते. मात्र, वाघा बॉर्डरवर आणूनही त्यांना सोडण्याची वेळ दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. याचे कारण धक्कादायक आहे. अभिनंदन यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. या व्हिडिओमध्ये त्यांना काय बोलायला लावले, याबाबत अद्याप समोर आलेले नसले, तरीही हा व्हिडिओ पाकिस्तान त्यांची बाजू मांडण्यासाठी वापरण्याची शक्यता आहे.
भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकने बुधवारी (27 फेब्रुवारीला) सकाळी भारतात घुसखोरी केली होती. पाकच्या विमानांना पिटाळून लावताना मिग-21चे विंग कमांडर पाकच्या हद्दीत शिरले होते. तेथे त्यांचे विमान पाडण्यात आले. पण त्यांनी लगेच पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र स्थानिकांनी त्यांना पोलिसांच्या व नंतर लष्कराच्या ताब्यात दिले. त्यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. त्यानंतर पाकिस्ताननं अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सुपूर्द केलं आहे.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिनंदन यांचे मायदेशी स्वागत केले आहे.
का होणार वैद्यकीय चाचणी?पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांना भारताकडे सोपविले असले तरीही त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना वाघा बॉर्डरवरून दिल्लीला नेण्यात आले आहे. वैद्यकीय चाचणी गरजेची आहे, कारण ते विमानातून पॅरॅशूटच्या साह्याने बाहेर प़डले आहेत. यामुळे त्याचे शरीर मोठ्या दबाव आणि तणावातून गेलेले आहे. याशिवाय मारहाणही झालेली आहे. असे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
घाणेरडे राजकारण; अभिनंदन यांना पाकिस्तान आर्मीचे गुणगान करायला भाग पाडले