ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर आज जगभरातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. त्यांची कामगिरीसुद्धा तशीच आहे. एकाचवेळी 104 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करुन त्यांनी नवा इतिहास रचला. भारताने आज अवकाश संशोधनात जी प्रगती केली आहे. तसाच पाकिस्तानचाही अवकाश कार्यक्रम आहे. फार कमी जणांना पाकिस्तानच्या या अवकाश कार्यक्रमाबद्दल माहिती असेल.
भारताच्या आठवर्ष आधी 1961 मध्ये पाकिस्तानच्या अवकाश कार्यक्रमाची सुरुवात झाली. अमेरिकेचे दिवंगत लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली त्याचवर्षी पाकिस्तानचा अवकाश कार्यक्रम सुरु झाला होता. जागतिक ख्यातीचे पाकिस्तानचे शास्त्रज्ञ अब्दुस सालाम यांनी पाकिस्तानचा राष्ट्रीय अवकाश कार्यक्रम सुरु करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांना तयार केले.
त्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कराचीमध्ये सुपारको या पाकिस्तानच्या अवकाश प्रकल्पाचे मुख्यालय सुरु झाले. पाकिस्तानच्या चार अव्वल शास्त्रज्ञांना अवकाश संशोधन शिकण्यासाठी अमेरिकेत नासामध्ये पाठवण्यात आले. 1962 मध्ये सुपारकोने नासाच्या मदतीने 'रेहबार' हे पहिले रॉकेट अवकाशात पाठवले. इस्त्रायल आणि जापाननंतर रॉकेट लाँच करणारा पाकिस्तान आशिया खंडातील तिसरा देश होता.
पण आज भारताच्या अवकाश कार्यक्रमाशी तुलना केल्यास पाकिस्तान कित्येकवर्ष पिछाडीवर आहे. मिशन सक्सेस आणि तंत्रज्ञान दोन्ही आघाडयांवर पाकिस्तान भारताच्या जवळपासही नाही. भारताने आज 104 उपग्रह प्रक्षेपित करुन नवा विश्वविक्रम रचला. त्याचवेळी पाकिस्ताकडे आज स्वत:ची उपग्रह प्रक्षेपित करण्याची यंत्रणाच नाहीय.
पाकिस्तानने अशी यंत्रणा विकसित करण्यासाठी 2040 चे लक्ष्य ठेवले आहे. त्यावेळी भारताने शुक्र आणि मंगळावर पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अपुरा निधी, सरकारचे दुर्लक्ष आणि वारंवार सत्ता बदलातून वैज्ञानिक उद्दिष्टात होणारा हस्तक्षेप यामुळे पाकिस्तानच्या अवकाश कार्यक्रमाची पार वाट लागली. 1990 साली चीनच्या मदतीने पाकिस्तानने बादर 1 हा आपला पहिला उपग्रह प्रक्षेपित केला.