ऑनलाइन लोकमत
अमृतसर, दि. 7 - पंजाबमधील अटारी येथील भारत-पाकिस्तान सीमेवर भारताने सोमवारी सर्वात उंच तिरंगा झेंडा फडकवला. अगदी पाकिस्तानच्या लाहोर शहरातूनही हा तिरंगा डौलाने फडकताना दिसतो. या तिरंग्यामुळे समस्त भारतीयांच्या मनात अभिमानाची भावना असली तरी, पाकिस्तानच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाली आहे.
पाकिस्तानमध्ये या तिरंग्याबद्दल अस्वस्थततेची भावना असून, पाकिस्तानी रेंजर्सनी आपली नाराजी सीम सुरक्षा दलाला (BSF) कळवली आहे. सीमेवरुन हा झेंडा दुसरीकडे हलवण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे. भारत या झेंडयाचा उपयोग हेरगिरीसाठी करु शकतो अशी भिती पाकिस्तानला आहे.
तिरंगा फडकवण्यात आलेल्या ध्वजस्तंभाची उंची ११० मीटर (३६० फूट), रुंदी २४ मीटर आणि वजन ५५ टन आहे. रांचीतील ९१.४४ मीटर (३०० फूट) उंच ध्वज स्तंभाला या ध्वजाने मागे टाकले आहे. सीमेपासून १५० मीटर अंतरावर हा झेंडा स्थापन करण्यात आला आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथे जमणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी हा झेंडा आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
पंजाब सरकारच्या अमृतसर सुधार न्यास प्राधिकरणाने ३.५० कोटी रुपये खर्च करून ही योजना आकाराला आणली आहे. राज्यात अद्यापही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे उद्घाटनासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष मंजुरी घेण्यात आली होती.