पाकिस्तान आणि भारतात सध्या विस्तवही जात नाहीय एवढे वातावरण तंग बनले आहे. सतत भारताला पाण्यात पाहणारा पाकिस्तान आता आर्थिक गर्तेत एवढा खोल बुडालाय की त्याचे तुकडे तुकडे व्हायचे बाकी राहिले आहेत. अशातच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि भारताविरोधात आग ओकणारे बिलावल भुट्टो गोव्यात येणार आहेत.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारताने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना निमंत्रण पाठवले आहे. बैठक गोव्यात होणार आहे. बिलावल भुट्टो यांना गोव्यात होणाऱ्या SCO शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आल्याची पुष्टी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. ही सामान्य प्रक्रिया असून सरकारने अद्याप यावर निर्णय घेतला नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.
काहीही असले तरी पाकिस्तानला या बैठकीला न येणे जमणारे नाही. रशिया आणि चीनचे परराष्ट्र मंत्रीही एससीओच्या बैठकीला उपस्थित राहणार असून बिलावल आले नाहीत तर पाकिस्तानवर नामुष्की ओढवणार आहे. यामुळे भुट्टो काहीही झाले तरी गोव्याला जाणार असल्याचे पाकिस्तानी सुत्रांचे म्हणणे आहे.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची ही परिषद मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. पाकिस्तानमध्ये राजकीय उलथापालथ सुरू आहे. दोन प्रांतांत इम्रान खान यांच्या खेळीमुळे पुन्हा निवडणूक लागली आहे. पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून, ते डिफॉल्ट होण्याचा धोका आहे. या साऱ्यातून सावरण्यासाठी भुट्टो रशिया, चीनसमोर हात पसरू शकतात.
निवडणुका दोन वर्षांसाठी पुढे ढकलल्या जाऊ शकतात, अशी चर्चाही पाकिस्तानी माध्यमांमध्ये आहे. असे झाल्यास इम्रान खान तिथे काहीतरी घडविण्याची शक्यता आहे. पंजाबमधील निवडणुकांसोबतच केंद्र सरकारच्या निवडणुका घेण्यासाठी इम्रान खान पाकिस्तानी लष्करावर दबाव आणत आहेत. पाकिस्तानात मे महिन्यात निवडणुका झाल्या तर इम्रान खान यांची लोकप्रियता एवढी आहे की ते शाहबाज सरकारचा पराभव करू शकतात. यामुळे तिथे गृहयुद्ध भडकण्याची चिन्हे आहेत. या साऱ्या परिस्थीतीत मदतीचा हात मिळविण्यासाठी पाकिस्तानला ही बैठक महत्वाची आहे.