नवी दिल्ली - कलम 370 हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षातील नेत्यांनी अनेक विधानं केली. याच विधानाचा वापर करून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतंय. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाला लिहिलेल्या पत्रात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिलेल्या विधानाचा हवाला देत काश्मीरमधील स्थिती खराब असल्याचा दावा केला आहे. मात्र राहुल गांधींच्या विधानाचा वापर पाकिस्तानने केल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
भाजपाने काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना या प्रकरणावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय वातावरण पाहता राहुल गांधींनी पुन्हा एकदा ट्वीट करून स्पष्ट केलं आहे की, काश्मीर भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे पाकिस्तानसह इतर देशांनी या प्रकरणात हस्तक्षेप करू नये त्यासोबत काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
मात्र राहुल गांधींच्या या ट्वीटवरून पाकिस्तानचे सूचना आणि माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन यांनी राहुल गांधीवर टीका केली आहे. फवाद हुसैन यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, तुमचं गोंधळलेलं राजकारण ही मोठी समस्या आहे. तुमची भूमिका वास्तववादी असणं गरजेचे होते. तुम्ही तुमच्या आजोबांकडून बोध घ्यायला हवा होता. त्यांनी भारतात धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचारांचे प्रतिनिधित्व केले. फवाद यांनी आपल्या ट्वीटसोबत एक शायरीही सांगितली आहे.
काश्मीर मुद्द्यावर राहुल गांधींच्या वक्तव्याचा वापर पाकिस्तानने केल्याबाबत राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, अनेक मुद्द्यांवर आम्ही सरकारला विरोध करतो. मात्र एक बाब स्पष्ट करु इच्छितो की, काश्मीर भारताचा अंतर्गत मामला आहे. त्यात पाकिस्तान अथवा कोणत्याही देशांनी हस्तक्षेप करण्याचा संबंध नाही. जम्मू काश्मीरमध्ये हिंसा आहे. पाकिस्तानमधील काही लोक येथील लोकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त करतात. जगभरात पाकिस्तानाला दहशतवाद्यांची भूमी म्हणून ओळखली जाते.
पाकिस्ताननं काश्मीरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रात दिलेल्या प्रस्तावात राहुल गांधींच्या विधानाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर काँग्रेसनं या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, पाकिस्तान राहुल गांधींचं नाव विनाकारण बदनाम करत आहे. जेणेकरून ते करत असलेले खोटे दावे खरे ठरतील असा आरोप काँग्रेसने केला आहे.