नवी दिल्ली: जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून सीमेवर हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधात कुटनीतीचा अवलंब करत आहे. मात्र, चीनशिवाय कोणताही देश पाकिस्तानच्या मागे उभे राहताना दिसत नसल्याने पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यातच पाकिस्तानने आता नियंत्रण रेषेवर नापाक हरकती करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर 2000पेक्षा जास्त सैनिकांना तैनात केल्याचे समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने एलओसीच्या बाग आणि कोतली सेक्टरजवळील पाकव्याप्त काश्मीरमध्ये 2000पेक्षा जास्त सैनिक तैनात करण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानने सध्यातरी सैनिक आक्रमक जागेवर तैनात केले नाहीत, परंतु आमची पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींवर बारीक नजर असल्याचे भारतीय लष्करांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटना स्थानिक व अफगाणी तरुणांना दहशतवादी होण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर मुद्दा घेऊन गेले. मात्र चीनशिवाय इतर कोणत्याही देशांनी पाकला पाठिंबा दिला नाही. त्यानंतर जगभरात भारताला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं. फेक न्यूज, बनावट व्हिडीओ शेअर करत काश्मीरवरून भारताला टार्गेट केलं. यावरूनही हातात काहीच लागत नसल्याने भारताला अण्वस्त्र युद्धाची पोकळ धमकीही देऊन झाली. मात्र आता पाकिस्तानला भारतासमोर झुकण्याशिवाय पर्याय राहिला नाही.