नवी दिल्ली : सीमारेषेपलीकडून पाकिस्तान सातत्याने गोळीबार करत असल्याने परिस्थिती तणावपूर्ण आहे. सोमवारी सकाळी पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. तर रविवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे 4 जवान शहीद झाले. या घटनेचे पडसाद आज जम्मू-काश्मीरच्या विधानसभेतही पाहायला मिळाले. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा आज येथील सभागृहात देण्यात आल्या.
जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत सोमवारी जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. पाकिस्तानच्या वाढलेल्या कारवाया आणि शस्त्रसंधी उल्लंघनाचा मुद्दा विरोधकांनी उचलला. त्यानंतर भाजपा आमदार रवींद्र रैना यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. गदारोळ वाढल्यानंतर विधानसभा तहकूब करावी लागली.
भारताचे चार जवान शहीद -
पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. राजौरी जिल्ह्यातील तारकुंडी व सुंदरबनी भागामध्ये रविवारी संध्याकाळपासून अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. पाकिस्तानने क्षेपणास्त्राचा मारा करुन भारतीय लष्कराचे पूर्ण बंकर फोडले. त्यामध्ये भारतीय लष्कराचे कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासहित तीन जवान शहीद झाले. कॅप्टन कपिल कुंडू फक्त 23 वर्षांचे होते आणि गुरुग्रामजवळील रनसिका गावचे रहिवासी होते. आपल्या विधवा आईचा एकमेव आधारदेखील तेच होते. विशेष म्हणजे 10 फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस होता. आधी पती आणि आता मुलगा गेल्यानंतर आयुष्यात कधी नव्हे ती पोकळी निर्माण झाली आहे. कॅप्टन कपिल कुंडू यांच्या आजोबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी केली आहे.
आजोबा म्हणतात आमचा एकुलता एक नातू गेला, आम्ही सगळंच गमावून बसलो -
शहीद कॅप्टन कपिल कुंडू यांच्या आजोबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावनिक आव्हान करताना म्हटलं की, 'आमचा नातू सीमेवर शहीद झाला याचा अभिमान आहे. तो आमचा एकुलता एक नातू होता, आम्ही सगळंच गमावून बसलोय. तुम्ही याचा बदला घेतला पाहिजे, फक्त दिलासा देऊन काम चालणार नाही'.