नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता भारतीय नौदलानं अरबी समुद्रात आयएनएस विक्रमादित्य आणि न्यूक्लिअर सबमरीन असलेल्या 60 युद्धनौका आणि 80 लढाऊ विमानं तैनात केली आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. नौदल हे पहिल्यापासूनच युद्धसराव करत आहे. परंतु 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर युद्धनौकांना अभ्यासाऐवजी बदल्याच्या कारवाईसाठी तैनात करण्यात आलं आहे.नौदलाच्या जवळपास 60 युद्धनौकांसह तटरक्षक दलाच्या 12 युद्धनौका आणि 80 लढाऊ विमानं सज्ज आहेत. नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डीके शर्मा म्हणाले, नौदल ट्रॉपिक्स अभ्यासात व्यक्त आहे. या अभ्यासामुळे पाकिस्तानकडून होत असलेल्या बारीकसारीक हालचाली टिपता येणार आहे. भारताच्या नौदलाची यंत्रणा सक्षम असल्यानं पाकिस्ताननं अजूनपर्यंत सीमा ओलांडलेल्या नाहीत.पाकिस्ताननं असं केल्यास आम्हाला त्याची तात्काळ माहिती मिळते, असंही शर्मा म्हणाले आहेत. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव विकोपाला गेला आहे. त्यानंतर भारतानंही बालाकोटमध्ये जैश-एम-मोहम्मदच्या ठिकाणांवर एअर स्ट्राइक केली होती. पाकिस्ताननं या एअर स्ट्राइकला प्रत्युत्तरादाखल भारतीय चौक्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता.
आता नेव्हीचा स्ट्राइक?, भारताकडून अरबी समुद्रात युद्धनौका, पाणबुड्या अन् लढाऊ विमानं तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 10:39 AM