ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले आहेत. या हल्ल्याविरोधात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर निषेध करत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. इस्लामाबादमध्ये होणा-या सार्क परिषदेला भारत अनुपस्थित राहणार आहे.
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं सार्क परिषदेतून माघार घेतली आहे. मात्र सर्व प्रकारावर पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी भारतासह पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. भारताचे पंतप्रधान नेहमीच पाकिस्तानसोबत युद्धाची भाषा करत असतात. त्यांनी आम्हाला नेपाळ आणि भूतानसारखी वागणूक देण्याचं टाळलं पाहिजे. काश्मीर मुद्दा व्यवस्थितरीत्या हाताळल्यास दहशतवादाचंही उच्चाटन होईल, असे ते म्हणाले आहेत.
माजी पंतप्रधान वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच शांततेची भूमिका घेतली होती. मात्र सध्याचे पंतप्रधान या प्रकरणात तशी भूमिका घेत नाहीत. ते पाकिस्तानवर कुरघोडी करत असतात. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज वाजपेयींच्या काळात मंत्रिपदी असताना पाकिस्तानबाबत शांततापूर्ण भूमिका घेत होत्या. मात्र आता मोदी सरकारच्या काळात त्या संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानवर टीका करत कुरघोडी करत आहेत, असंही मुशर्रफ म्हणाले आहेत. भारतानं उचललेल्या बलुचिस्तानच्या मुद्द्यामुळे अफगाणिस्तानसोबत आमचे संबंध खराब होत असल्याचं वक्तव्य मुशर्रफ यांनी केलं आहे.
आणखी वाचा
भारताच्या संयमाला पाकिस्ताननं गृहीत धरू नये, अमेरिकन प्रसारमाध्यमांनी खडसावलं