ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानात मानवाधिकारांच्या हक्काची सर्रास पायमल्ली केली जात असल्यामुळे अत्याचाराबाबत आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा लवकरच उघड करू, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी पाकव्याप्त काश्मीरसोबत बलुचिस्तानही भारताचाच भाग असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रदेश भारताला परत द्या, असा इशाराच मोदींनी पाकला दिला आहे.
काश्मीरमधल्या स्थितीसंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर ते बोलत होते. केंद्र सरकार जम्मू आणि काश्मीरमधल्या जनतेच्या भावना जाणते. मात्र, देशाच्या अखंडतेला तडा जाऊ देणार नाही, असा इशारा चार तास चाललेल्या बैठकीत मोदींनी सर्वपक्षीयांना दिला आहे.
या बैठकीला जम्मू आणि काश्मीरमधील सहकारी पक्ष पीडीपी हाही उपस्थित होता. या बैठकीत विरोधी पक्षांनी काश्मीरमधील काही भागात लष्करांकडून सुरू असलेली पेल गन कारवाई आणि अफ्स्पा कारवाई शिथिल करावी, अशा मागणी लावून धरली आणि काश्मीरमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय मंडळाने जम्मू आणि काश्मीरला भेट द्यावे, अशी मागणीही विरोधकांनी बोलून दाखवली. मात्र, ही मागणी सरकारने फेटाळत काश्मीरवरील स्थिती घटनात्मक पद्धतीने सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.