Jammu-Kashmir Elections : श्रीनगर :जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रामगडमध्ये भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभा झाली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी खोऱ्यातील जनतेला मोठे आश्वासन दिले. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास पाकव्याप्त काश्मीर (पीओके) जम्मू-काश्मीरचा भाग होणार आहे. यामुळेच पाकिस्तानात खळबळ उडाली आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
एका बाजूला भारत आहे आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे. पाकिस्तानमध्ये अन्नधान्याची टंचाई आहे, साहजिकच गरीब पाकिस्तान आज स्वत:ला सांभाळू शकत नाही. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर त्यातून वेगळे होण्यासाठी आवाज उठवत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लोक म्हणत आहेत की, आम्हालाही जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार आहे. तर आमची केमिस्ट्री पाकिस्तानशी जुळत नाही, असे बलुचिस्तान सांगत आहे. कारण पाकिस्तान मानवतेचा शत्रू आहे, तो मानवतेचा कर्करोग आहे. या कर्करोगापासून जगाची मुक्तता झाली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
जाहीर सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, मला राहुल गांधींना विचारायचे आहे की जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र ध्वज देण्याबाबत नॅशनल कॉन्फरन्सने जे म्हटले आहे, त्याचे ते समर्थन करतात का? कलम ३७० आणि ३५ ए परत आणण्याच्या आणि जम्मू-काश्मीरला अशांतता आणि दहशतवादाच्या युगात ढकलण्याच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या मागणीला राहुल गांधी समर्थन देतात का? काश्मीरमधील तरुणांच्या किंमतीवर पाकिस्तानशी बोलून पुन्हा फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचे काँग्रेस समर्थन करते का? असे सवाल करत योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
ओमर अब्दुल्ला यांनी भाजपवर निशाणा साधलादुसरीकडे, माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स नेते ओमर अब्दुल्ला यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, "आम्हाला भाजपकडून आणखी काही अपेक्षा नाही. नॅशनल कॉन्फरन्स हा असा पक्ष आहे, ज्याने गेल्या ३५ वर्षात हजारो बलिदान दिले आहे. जर आम्हाला पाकिस्तानच्या अजेंड्यानुसार जायचे होते, तर आम्ही ३५ वर्षांपूर्वी गेलो असतो, तर कदाचित आपल्या ४५०० हून अधिक साथीदारांचा बळी गेला नसता. जर अमित शाहांना नॅशनल कॉन्फरन्सच्या त्या बलिदानाकडे दुर्लक्ष करायचे असते, तर आम्ही काय करू शकतो?"