श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. याच दरम्यान आता प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दहशतवादी हल्ला घडवण्याचा पाकिस्तानचा कट असल्याची माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याचा कट पाकिस्तानने आखला आहे. पाकिस्तान लष्कारातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात अल-बद्र या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गुप्तचर यंत्रणांना अल-बद्रचे अतिरेकी आणि पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील फोनवरील चर्चेची ऑडिओ क्लिप मिळवली आहे. या चर्चेत ते काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवण्याचा डाव आखत असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी अल-बद्र दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांची एक टीम आणि त्या व्यतिरिक्त आणखी आठ अतिरेक्यांना गेल्या दोन महिन्यांपासून विशेष प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती दिली आहे.
दहशतवादी हल्ला घडवण्याचा पाकिस्तानचा कट
अल-बद्रचे अतिरेकी आयईडी हल्ल्यांसाठी ओळखले जातात. आयएसआयचे दोन कर्नल, रॅक ऑफिसर कर्नल वसीम आणि कर्नल रियाज संबंधित अतिरेक्यांच्या गटाला प्रशिक्षण देत आहेत. हत्यारांचा वापर कसा करावा, मोठे स्फोटक हल्ले करण्यासाठी मिनी ड्रोनचा उपयोग कसा करावा याबाबतचे अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी ब्रिगेडियर काशिफ यांनी अलीकडेच छंब येथील टिल्ला परिसरातील दहशतवादी गटाच्या प्रशिक्षणाच्या प्रगतीची माहिती दिली. या गटाला आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जम्मू-काश्मीरमधील प्रशासन सतर्क, अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याचा कट रचत असल्याची माहिती मिळताच जम्मू-काश्मीरमधील पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरामध्ये पोलिसांसह 42-आरआर आणि सीआरपीएफ-130 बटालयिनच्या तुकडीने केलेल्या संयुक्त कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आलं होतं. अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेला संवेदनशील माहिती देखील पुरवत होते.