इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्कराला पूर्ण सूट दिली आहे. भारतीय सैन्यानं कारवाई केल्यास पाकिस्तानी सैन्यानं जशास तसं उत्तर द्यावं, असे आदेश खान यांनी लष्कराला दिले आहेत. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची योजना जम्मू-काश्मीरमध्ये तयार करण्यात आली होती, असंदेखील त्यांनी म्हटलं. पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर गेल्या आठवड्यात दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 40 जवान शहीद झाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्याला पूर्णपणे सूट दिली असल्याचं एका रॅलीला संबोधित करताना म्हटलं होतं. आता कारवाईची वेळ आणि ठिकाण लष्कर ठरवेल, असं मोदी जाहीरपणे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी आज लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या आधी ही चर्चा झाल्याचं वृत्त एआरवाय न्यूजनं दिलं. खान आणि बाजवा यांच्यात देश आणि त्याच्या आसपासचा भाग यांची सुरक्षेवर चर्चा झाली. पुलवामातील हल्ल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध हे चर्चेचे मुख्य विषय होते.
भारतानं कारवाई केल्यास चोख प्रत्युत्तर द्या; इम्रान खान यांचे सैन्याला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 9:59 PM