नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेले अडीच महिने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, आंततराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने केलेल्या ट्विटर टूलकिट प्रकरणी देशात दिशा रविला अटक करण्यात आल्यानंतर या वादात आता पाकिस्तानने उडी घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने ट्विट करत दिशा रविला पाठिंबा दर्शवला आहे. (pakistan pm imran khan party supports disha ravi on toolkit case)
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पाकिस्तानशी संबंध असल्याचे उघडकीस केले होते. यानंतर आता ट्विटर टूलकिट प्रकरणी इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाने पर्यावरण कार्यकर्ता दिशा रविला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
टूलकिट प्रकरण: निकिता जेकब फरार घोषित; अजामीनपात्र वॉरंट जारी
इम्रान खानचा पक्ष नेमके काय म्हणतोय?
भारतात मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार त्यांच्याविरोधात गेलेल्या प्रत्येकाला गप्प करण्यावर विश्वास ठेवते. क्रिकेटपटू आणि बॉलिवूडमधील दिग्गजांचा उपयोग करून घेणे लज्जास्पद होते. मात्र, आता त्यांनी टूलकिट प्रकरणात दिशा रविला अटक केली आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर रॅली हिंसाचारात पाकिस्तानचा संबंध उघड केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला असून, त्यामुळे दिशा रविला पाठिंबा देऊन मोदी सरकारवर इम्रान खानच्या पक्षाने टीका केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, जर २२ वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झाला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठीचे एक टूलकिट भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनी सैनिकांपेक्षाही धोकादायक झाले आहे, असा आरोप पी. चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. तसेच काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी देखील दिशाच्या अटकेचा विरोध केला आहे. "कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल", असे म्हणत मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दिशा रवि अटक प्रकरणी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
तत्पूर्वी, पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या दिशा रविला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतकऱ्यांशी संबंधित टूलकिट सोशल मीडियावर शेअर केल्याच्या प्रकरणात दिशा रवीला शनिवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विनंतीवरून दिल्ली न्यायालयाने निकिता जेकब यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.