नवी दिल्ली - पाकिस्तानकडून विविध प्रकारे भारतीय हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहे. मात्र भारतीय जवानांकडून पाकिस्तानचे सर्व प्रयत्न हाणून पाडले जात आहेत. भारतीय जवानांना जम्मू काश्मीरमध्ये एलओसीजवळ घिरट्या मारणारं पाकिस्तानी लष्कराचं एक क्वाडकॉप्टर पाडण्यात मोठं यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे क्वाडकॉप्टर सकाळच्या सुमारास जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये घिरट्या मारत होतं.
पाकिस्तानचे हे क्वाडकॉप्टर चीनी कंपनी डीजेआयने तयार केले होते. सीमारेषेवरील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी व दहशतवाद्यांना घुसखोरीस मदत व्हावी यासाठी हे क्वाडकॉप्टर घिरट्या घालत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच यासाठी ड्रोनची देखील मदत घेतली जाते. शनिवार (24 ऑक्टोबर) सकाळी आठच्या सुमारास एलओसीजवळ हे क्वाडकॉप्टर घिरट्या घालत असताना भारतीय जवानांनी ते पाडलं आहे.
क्वाडकॉप्टरचा वापर हा हेरगिरीसाठी केला जातो. याच्या माध्यमातन फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड केले जातात. क्वाडकॉप्टरचं मॉडल DJI मॅविक 2 प्रो आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून सुमारे अडीचशे दहशतवादी सीमा ओलांडून भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे कारस्थान भारतीय लष्कराने उघड केले. काश्मीर सीमेवर पाकिस्तान या हालचाली करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले होते.
250 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; पाकिस्तानचे कारस्थान; त्याला चीनचीही साथ
भारताविरोधात चीन व पाकिस्तान संयुक्तपणे कारस्थान रचत असल्याची टीका संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी नुकतीच केली होती. त्यानंतर काही दिवसांनीच पाकिस्तानच्या आणखी एका कटाचा पर्दाफाश भारतीय लष्कराने केला. मेजर जनरल अमरदीपसिंह औजला यांनी सांगितले की, उन्हाळ्यात सीमेपलीकडून घुसखोरीचे जितके प्रयत्न होतात. मात्र, हिवाळ्यातही दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरीचे प्रयत्न झाले, तर ते हाणून पाडण्यास भारतीय लष्कर समर्थ आहे. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना बोचऱ्या थंडीपासून वाचण्यासाठी तशी साधने दिली तरी भारतीय लष्कराकडे त्याहीपेक्षा आधुनिक अत्याधुनिक उपकरणे असून, त्याद्वारे घुसखोरी करणाºया दहशतवाद्यांचा छडा लावून त्यांचा बीमोड केला जाईल, असे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.
चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कर सज्ज
लडाखच्या सीमेवर चीनने सैन्याची मोठी जमवाजमव केल्यामुळे कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतानेही त्या भागात आपले सैन्य सज्ज ठेवले आहे. त्याचवेळी आता हिवाळ्यात दहशतवाद्यांची भारतात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करण्याचा पाकिस्तानने डाव आखला आहे; पण या दोन्ही देशांच्या कुटिल कारस्थानांना भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.