श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात शहापूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने बुधवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सकाळी पावणेआठच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार आणि मोर्टर शेलचा मारा सुरु झाला. भारताच्या बाजूला कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. भारतीय जवानही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत.
पूँछ-रावलकोट मार्गावर चाकन दा बाग येथून दोन्ही देशांमध्ये प्रवास आणि व्यापार सुरु झाल्यानंतर आठवडयाभराने पाकिस्तानकडून गोळीबार झाला. आठ आणि नऊ जुलैला पाकिस्तानकडून चाकन दा बाग भागात मोर्टर शेल डागल्यानंतर या मार्गावरुन प्रवास आणि व्यापार बंद करण्यात आला होता. जवळपास चार महिने या मार्गावरुन सर्व व्यवहार बंद होते.
भारत-पाकिस्तान सीमेवर या वर्षात शस्त्रसंधी उल्लंघनाच्या या वर्षात जवळपास 300 घटना घडल्या आहेत. यामध्ये 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. जवानांचाही मृतांमध्ये समावेश आहे. 31 ऑक्टोंबरला कारमारा गावातील गुलनाझ अख्तर ही 12 वर्षांची मुलगी गोळीबारात जखमी झाली होती.
दहशतवाद्यांना अभय देणे खपणार नाही
मागच्या महिन्यात दहशतवाद्यांची आश्रयस्थळे खपवून घेतली जाणार नाहीत, अशा कणखर शब्दांत भारत आणि अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यास ठणकावले. या दहशतवादी संघटनांमुळे पाकिस्तानच्या स्थैर्याला आणि सरकारला धोका निर्माण झाला आहे. तेव्हा पाकिस्तानने दहशतवादी संघटनांविरुद्ध कठोर पावले उचलावीत.
भारताच्या विदेशमंत्री सुषमा स्वराज आणि अमेरिकेचे विदेशमंत्री रेक्स टिलरसन यांनी एच-१-बी व्हिसा, अफगाणिस्तानमधील स्थिती, भारत-अमेरिका सुरक्षा सहकार्य आणि भारत-प्रशांत विभाग व उत्तर कोरिया या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर व्यापक चर्चा केल्यानंतर, घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून पाकिस्तानला उपरोक्त तगडा संदेश दिला.