नवी दिल्ली - बकरी ईदच्या निमित्ताने भारताकडूनपाकिस्तानला मिठाई देण्यात आली मात्र पाकने मिठाई घेण्यास नकार दिला आहे. हुसैनीवाला बॉर्डरवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही पाकिस्तानच्या सैन्याला ईदच्या निमित्ताने मिठाई पाठवण्याचा प्रस्ताव दिला मात्र पाकिस्तानच्या सैन्याकडून त्यासाठी नकार आला आहे. कोणताही मोठा सण असतो तेव्हा दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना मिठाई पाठवतात ही प्रथा आहे. मात्र जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर भारत-पाक यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ जवानांकडून पाकिस्तानी सैन्याला मिठाई देण्याचा कार्यक्रम केला गेला. मात्र सध्या दोन्ही देशांमधील तणाव इतका वाढला आहे की, पाकिस्तानी सैन्याकडून भारताच्या मिठाईला नकार देण्यात आला.
बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानकडून बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अटारी-वाघा बॉर्डर आणि हुसैनीवाला बॉर्डरवर मिठाई देण्या-घेण्यासाठी कोणताही संदेश आला नाही. याआधी पाकिस्तानकडून संदेश प्राप्त झाल्यानंतर भारताकडून मिठाई दिली जात होती. मात्र यंदा असं झालं नाही.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम भारत सरकारने रद्द केल्यामुळे पाकिस्तानने लाहोर-दिल्ली बससेवा निलंबित करण्याची घोषणा केली. सोमवारपासून ही बससेवा स्थगित केली जाईल, असे पाकिस्तानने म्हटलं होतं.
फेब्रुवारी 1999 मध्ये ही बससेवा सुरू करण्यात आली होती. 2001 मध्ये भारतीय संसदेवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर ही बससेवा निलंबित करण्यात आली होती. 2003 मध्ये ती पुन्हा सुरू करण्यात आली होती. पाकिस्तानचे संपर्क व डाक सेवामंत्री मुराद सईद यांनी सांगितले की, ‘राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बुधवारच्या बैठकीतील निर्णयाला सुसंगत निर्णय घेऊन लाहोर-दिल्ली बससेवा निलंबित करण्यात येत आहे.’ पाकिस्तानच्या संपर्क मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात मात्र या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार असल्याचे म्हटलं होतं.
तसेच पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध औपचारिकरीत्या संपुष्टात आणले आहेत. पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत संसदेच्या संयुक्त अधिवेशनात यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत भारतासोबतचे व्यापारी संबंध संपविण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले, असे पाकिस्तानातील आघाडीचे दैनिक ‘डॉन’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.