लाहोर: पाकिस्तानचा अमानवी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. विशेष म्हणजे पाकिस्ताननं स्वातंत्र्य दिनालाच असंवेदनशीलचा कळस गाठला आहे. भारतातून तुर्कस्तानला जात असलेल्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्यानं वैमानिकानं लाहोर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केलं. मात्र या प्रवाशाला वैद्यकीय मदत पुरवण्यास पाकिस्ताननं नकार दिला. वैद्यकीय उपचारांची गरज असलेली भारतीय असल्यानं मदत करणं शक्य नसल्याचं कारण पाकिस्तानकडून देण्यात आलं. राजस्थानच्या भिवाडी शहरातील विपिन तुर्कस्तानला जात असताना त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे वैमानिकानं लाहोर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केलं. यानंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय मदत मागण्यात आली. मात्र विपिन भारतीय असल्यानं त्याला वैद्यकीय मदत पुरवता येणार नाही, असं विमानतळावरील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. सध्या विपिनवर गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 13 ऑगस्टला (काल) हा संपूर्ण प्रकार घडला. विपिन प्रवास करत असलेलं विमान लाहोर विमानतळावर उतरल्यावर जवळपास 3 तास तो तडफडत होता. मात्र विमानतळावरील अधिकाऱ्यांनी मदत दिली नाही. त्यामुळे तुर्की एअरलाईन्सच्या वैमानिकानं विमान पुन्हा भारताच्या दिशेनं वळवलं. यानंतर विमानानं दिल्ली विमानतळावर लँडिग केलं आणि विपिनला गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विपिनची प्रकृती अजूनही गंभीर आहे. विपिनसोबत प्रवास करत असलेल्या जालंधरच्या पंकज मेहता यांनी ट्विटच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना दिली आहे.
पाकचा अमानवी चेहरा पुन्हा उघड; भारतीय असल्यानं तडफडणाऱ्या प्रवाशाला नाकारली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 9:04 PM