ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - पाकिस्तानने भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीरमधील नौशैरा विभागात केलेल्या कारवाईचा दावा फेटाळून लावला आहे. नियंत्रण रेषेनजीक कारवाई केल्याचा भारतीय लष्कराचा दावा खोटा असल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. भारतीय लष्कराने नौशेरा विभागात कारवाई करून पाकिस्तानची चौकी उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ आज दुपारी प्रसारित केला होता.
जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीला मदत करणाऱ्या पाकिस्तानी चौक्या भारतीय लष्कराने कारवाई करुन उद्ध्वस्त केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. मेजर जनरल अशोक नरुला यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती देताना कारवाईचा हा व्हिडीओही प्रसारित केला होता.
हा व्हिडीओ 30 सेकंदाचा असून, त्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या चौक्या लष्कराने तोफगोळयाच्या वर्षाव करुन उद्ध्वस्त केल्याचे दिसत आहे. दहशतवाद विरोधी रणनितीतंर्गत ही कारवाई करण्यात आली. सीमेवर घुसखोरीला मदत करणा-या पोस्टसवर वेळोवेळी अशा प्रकारची कारवाई केली जाते अशी माहिती मेजर नरुला यांनी दिली.
घुसखोरीला मदत केली तर अशाच प्रकारची कारवाई यापुढेही केली जाईल असा संदेश लष्कराने दिला आहे. भारताची ही कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक नाहीय. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारताने सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा भारतीय लष्कराच्या विशेष कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. यावेळी भारतीय सैन्याने आपल्याच हद्दीतच राहून जोरदार गोळीबार आणि तोफगोळयांचा वर्षाव केला. ज्यामध्ये पाकिस्तानी चौक्या आणि त्यांचे बंकर उद्ध्वस्त झाले.
Indian claims of destroying Pakistani post along LOC in Naushera Sec and firing by Pak Army on civilians across LOC are false: Pak Army— ANI (@ANI_news) May 23, 2017