ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 20 - काश्मीर खो-यात फुटीरतावादी हुर्रियतचे नेते आणि दहशतवादी गटांमध्ये विसंवाद वाढत चालला आहे. झाकीर मुसासारख्या दहशतवाद्याने खुलेआम फुटीरतवाद्यांना धमकी देताना हिंसाचाराचे समर्थन केले होते. झाकीरची भाषा पाकिस्तानच्या काश्मीर धोरणाला अनुकूल अशीच आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये बसलेले दहशतवाद्यांचे मोहोरके झाकीर सारख्या दहशतवाद्यांना हाताशी पकडून काश्मीरमध्ये नव्या दहशतवादी संघटनेची उभारणी करत असावेत असा संशय भारतीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
फुटीरतावाद्यांना इस्लामिक संघर्ष म्हणा अन्यथा मुंडकी छाटू अशी धमकी देणा-या झाकीर मुसाने हिजबुल मुजाहिद्दीनबरोबर संबंध तोडले आहेत. फुटीरतवाद्यांबद्दल झाकीरने जे वक्तव्य केले त्याला पाठिंबा द्यायला हिजबुलने नकार दिला. त्यावरुन झाकीर आणि संघटनेमध्ये मतभेद झाल्याने तो हिजबुलमधून बाहेर पडला. झाकीरने काश्मीरमध्ये बुरहान वानीची जागा घेतली आहे.
नव्वदच्या दशकात काश्मीरमध्ये जे वातावरण होते तसेच वातावरण आता आहे. तरुण मोठया प्रमाणावर दहशतवादाकडे वळले आहे. एकूणच या परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी पाकिस्तान 1990 च्या दशकातील आपली काश्मीर रणनिती राबवू शकतो. त्यावेळी पाकिस्तानने पडद्यामागे राहून काश्मीर खो-यात मोठया प्रमाणावर दहशतवाद निर्माण केला होता. त्यावेळी जम्मू अँड काश्मीर लिबरेशन फ्रंट ही एकच दहशतवादी संघटना होती. पण पुढच्या तीन-चार वर्षात पाकिस्तानने तिथे अनेक दहशतवादी संघटना उभ्या केल्या होत्या.
मुसाने फुटीरतावाद्यांना दिलेल्या धमकीमध्ये काश्मीरमध्ये 27 वर्ष जो सशस्त्र लढा चालू आहे, तो इस्लामिक लढा आहे. त्याला राजकीय संघर्षाचे नाव देऊ नका. अन्यथा लाल चौकात तुमची मुंडकी छाटू असे त्याने म्हटले होते. काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांनी इस्लामिक दृष्टीने जी आखणी केलीय त्यात ढवळाढवळ करु नका. तुम्हाला काश्मीरचा संघर्ष राजकीय वाटतो तर, मशिदी. इस्लामिक चिन्ह आणि घोषणांचा वापर करु नका असा त्याने फुटीरतवाद्यांना इशारा दिला होता. सय्यद अली गिलानी, मीरवाईज उमर फारुख आणि यासीन मलिक हे काश्मीरमधील फुटीरतवादी गटाचे नेते आहेत. मागच्यावर्षी सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत बुरहान वानी मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. त्यानंतर इथली परिस्थिती अधिकच बिघडत गेली.