ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्र, दि. २२ - काश्मीर मुद्यावरुन पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ संयुक्त राष्ट्रात पूर्णपणे तोंडघशी पडले आहेत. काश्मीर प्रश्नी हस्तक्षेप करण्याची नवाझ शरीफ यांची मागणी संयुक्त राष्ट्राने फेटाळून लावली आहे.
भारत आणि पाकिस्तानने परस्परांशी चर्चा करुन काश्मीरसह अन्य वादांच्या मुद्यांवर तोडगा शोधावा असा सल्ला संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी नवाझ शरीफ यांना दिला. बान की मून यांना भेटून शरीफ यांनी काश्मीरमध्ये भारताकडून कसे मानवधिकाराचे उल्लंघन सुरु आहे त्याचा अहवाल सोपवला.
भारत आणि पाकिस्तानने परस्परांशी चर्चा करुन विषय सोडवणे दोन्ही देशांच्या आणि प्रदेशाच्या हिताचे आहे असे बान की मून यांनी शरीफ यांना सांगितले. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानी मिशनने दिलेल्या माहितीनुसार शरीफ यांनी काश्मीर संबंधातील अहवाल मून यांच्याकडे सोपवला. काश्मीरमध्ये कशा पद्धतीने अन्याय सुरु आहे त्याचे फोटो त्यांनी मून यांना दाखवले.