नवी दिल्ली- मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्याला आज 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळेच 26/11 या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 166 लोकांची हत्या करणारे खुलेआम फिरत आहेत. या हल्ल्याच्या सूत्रधारांना शिक्षा देण्यासाठी पाकिस्ताननं भारताला मदत करण्याची गरज आहे.26/11च्या हल्ल्यातील मास्टर माइंड पाकिस्तानमध्ये मोकळा फिरत आहे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याची योजना पाकिस्तानात बसून ठरवण्यात आली आणि तिकडूनच हल्लेखोरांना भारतात पाठवण्यात आलं. आम्ही पाकिस्तान सरकारला पुन्हा एकदा अपील करतो की, दुटप्पी भूमिका सोडून त्यांनी त्या हल्लेखोरांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, असंही परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 200८ रोजी रात्री समुद्रमार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. त्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये अधिकाऱ्यांसह शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता, तर 300हून अधिक जण जखमी होते. दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबला जिवंत पकडलं होतं आणि 21 नोव्हेंबर 2012ला त्याला फासावर चढवण्यात आलं. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजस्थानमधल्या भिलवाडामधल्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना पाकिस्तानवर हल्लाबोल केला होता. आम्ही संधीच्या शोधात आहोत. 26/11चा दहशतवादी हल्ला भारत कधीही विसरणार नाही. आम्ही दहशतवाद्यांविरोधात अशी कारवाई केली आहे की, त्यांना काश्मीरमधून बाहेर पडताही येत नाही आहे.
पाकनं दुटप्पी भूमिका सोडून 26/11च्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी- भारत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 7:40 PM