हरीश गुप्ता, नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पाकव्याप्त काश्मीर तसेच बलोचिस्तान आणि गिलगिटमधील जनतेवर पाकिस्तान सरकारकडून होणाऱ्या अत्याचारांचा उल्लेख केल्यानंतर भारतात त्यांच्या भाषणाचे स्वागत होत आहे. काँग्रेसनेही पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य तसेच बलोचिस्तान आणि गिलगिटमध्ये होणाऱ्या अत्याचारांचा मुद्दा उपस्थित केला आहे. काश्मीरच्या प्रश्नावर भारताशी चर्चा करण्याची भूमिका पाकिस्तानने लगेचच घेतली असली तरी तो आमचा प्रश्न असून, पाकिस्तानने त्यात नाक खुपसू नये. त्याबाबत अन्य कोणत्याही देशाशी चर्चा करणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे.पाकिस्तानने मात्र काश्मीरमध्ये अपयश आल्यामुळेच भारत सरकार आमच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप केला आहे. त्याहून भयंकर प्रकार म्हणजे अतिरेकी संघटनेचा प्रमुख हफिज सईद याने पाकिस्तानी लष्कराने भारतात सैन्य घुसवण्याचीच भाषा केली आहे. आतापर्यंत सईद याच्यावर पाकिस्तानने चित्रवाणीवर बंदी घातली होती. मात्र ती बंदी पाकने उठवली आणि त्याचे भाषण सविस्तर दाखविण्यात आले. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी सोमवारी मोदी यांच्यावर टीका केली होती. पण काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांच्या विधानांचे समर्थन केले. खुर्शिद यांचे ते मत वैयक्तिक होते, असे सांगून सुरजेवाला यांनी गिलीगट व बलोचिस्तानमधील जनतेवरील अन्याय व अत्याचारांचा मुद्दा उपस्थित केला. गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या भेटीवेळी पाकमध्ये त्यांचे झालेले थंड स्वागत व उभय देशांतील सध्याचे तापलेले वातावरण यामुळे जेटलींचा दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यजमानपद आपण चांगले भूषवू आणि जेटलींचे उत्साहपूर्ण स्वागत करू, असे सांगून पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न गेल्या आठवड्यात केला; मात्र त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका मवाळ झाली नाही. सार्क बैठकीसाठी अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल किंवा वित्त सचिव शक्तिकांत दास सार्क बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता आहे. सार्क परिषद नोव्हेंबरमध्ये इस्लामाबादेत होत असून, तत्पूर्वी मंत्रीस्तरीय परिषदा घेण्यात येत आहेत. मोदींचा पाकविषयीचा पवित्रा कठोर झाल्यामुळे संघ आणि परिवारातील संघटनाही खूश झाल्या आहेत. मोदींच्या पाकविषयीच्या वाढत्या मैत्रीपूर्ण पवित्र्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खूश नव्हता. सध्याच्या घडामोडी पक्षाची व्होटबँक मजबूत करणाऱ्या आहेत. पाकिस्तानला जाणे नरकात जाण्यासारखे आहे, असे सांगून संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकवर घणाघात केला होता. सार्क बैठकीत जाण्यास जेटलींचा नकारपाकिस्तानबाबत नरमाईचे धोरण स्वीकारायचे नाही, असे भारत सरकारचे धोरण दिसत असून, त्यामुळे दोन देशांतील संबंध घसरणीला लागल्याचे जाणवत आहे. मात्र पाकिस्तानातून अतिरेक्यांची घुसखोरी सुरूच असून, सोमवारी अतिरेक्यांशी लढताना सीआरपीएफचे कमांडंट प्रमोद कुमार हुतात्मा झाले. तसेच काश्मीरमधील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्नही पाककडून सुरू आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनीच गोंधळ करू इच्छिणाऱ्यांवर सुरक्षा दलांनी गोळीबार केला. त्यात चार ठार झाले. त्यामुळे तिथे तणाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर २५ व २६ आॅगस्ट रोजी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीला न जाण्याचा निर्णय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतला आहे. काश्मीर प्रश्नाबाबत तोडगा काढण्यासाठी भारत सरकारनेही जोरदार प्रयत्नांना सुरुवात केली असून, पाकव्याप्त काश्मीरमधून अत्याचारांमुळे काश्मिरात येणाऱ्या निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना केंद्रीय गृह मंत्रालयाने तयार केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंंह यांनीही मंगळवारी गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यात काश्मीरसाठी विशेष पॅकेज करण्याबाबत चर्चा केली. गिलगिट आणि बलोचिस्तान या प्रश्नाबाबत भारतातून एकच सूर व्यक्त व्हावा, अशी अपेक्षा माहिती व प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांनीही व्यक्त केली आहे.
पाकिस्तानने नाक खुपसू नये!
By admin | Published: August 17, 2016 5:03 AM