कलम ३७० बाबत पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या विधानाला नॅशनल कॉन्फ्ररन्स ओमर अब्दुल्ला यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा. त्यांना आमच्या निवडणुकांवर वक्तव्यं करण्याची आवश्यकता नाही. आमचं पाकिस्तानशी काही घेणं-देणं नाही. आम्ही पाकिस्तानमध्ये राहत नाही. काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा पाकिस्तानला कुठलाही अधिकार नाही, असे ओमर अब्दुल्ला यांनी ठणकावून सांगितले.
काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान, पाकिस्तानने काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचं समर्थन केल्यानंतर भारतात राजकारण पेटले होते. तसेच भाजपाने या मुद्द्यावरून काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सवर टीका करण्यास सुरुवात केली होती. त्याला ओमर अब्दुल्ला यांनी थेट शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा. त्यांना आमच्या निवडणुकांवर वक्तव्यं करण्याची आवश्यकता नाही. आमचं पाकिस्तानशी काही घेणं-देणं नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ए पुन्हा लागू करण्याच्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्स आघाडी ही एकमेकांसोबत आहे, असा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला होता. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आसिफ यांनी जियो न्यूजचे पत्रकार हामिद मीर यांच्याशी बोलताना सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ए पुन्हा लागू करण्याच्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि नॅशनल कॉन्फ्रन्स-काँग्रेस आघाडी हे एकत्र आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला होता.