नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादी सैरभैर झालेले आहेत. दहशतवाद्यांना आता पूर्वीसारखा पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत नाही, त्यामुळे ते सुरक्षा जवानांच्या हातातील शस्त्रे घेण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती उत्तर कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग चीफ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली आहे. ते म्हणाले, पाकिस्तान शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहे. तसेच अफगाण दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याच्या वृत्ताचंही त्यांनी खंडन केलं आहे. भारतीय लष्कराची तटबंदी मजबूत असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी जवान सक्षम आहेत. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील जवानांची तटबंदी मजबूत आहे.
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान गरळ ओकत आलाय. भारताला धडा शिकवण्यासाठी शस्त्रसंधीचं उल्लंघन करून दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावा यासाठी पाकिस्तानकडून सातत्यानं प्रयत्न सुरू असतात. पाकिस्तानी सैनिकांनी आज सकाळी नौशेरा सेक्टरमध्ये सकाळी 5.50 वाजता ते 7.30 वाजताच्या सुमारास गोळीबार केला होता.