नवी दिल्ली: भारतीय हवाई दलानंपाकिस्तानी सैन्याच्या सर्व दाव्यांची चिरफाड केली आहे. भारताच्या लष्करी तळांवर हल्ले केले नाहीत, एफ-16 विमानाचा वापर झालेलाच नाही, असे विविध दावे पाकिस्तानकडून करण्यात आले होते. हे सर्व दावे भारतीय हवाई दलानं खोडून काढले. 'प्रत्येक विमानाचा एक इलेक्ट्रॉनिक सिग्नल असतो. भारतीय संरक्षण दलांना मिळालेला सिग्नल एफ-16 सोबत जुळतो. पाकिस्तानचं विमान ज्या ठिकाणी कोसळलं, त्या ठिकाणी आम्हाला आमराम मिसाईलचे काही अवशेषदेखील सापडले आहेत. आमराम मिसाईल वाहून नेण्याची क्षमता केवळ एफ-16 विमानांमध्ये आहे. त्यामुळे पाकिस्ताननं एफ-16 विमानाचा वापर झाला होता, हे सिद्ध होता,' अशा शब्दांमध्ये हवाई दलाचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी पाकिस्तानच्या सर्व दाव्यांचं पोस्टमॉर्टम केलं. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज तिन्ही दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात हवाई दलानं पाकिस्तानच्या कारवायांची आणि त्याला भारताच्या बाजूनं देण्यात आलेल्या प्रत्युत्तराची माहिती दिली. यावेळी कपूर यांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला.
पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पुरावेच पुरावे; भारतीय हवाई दलाकडून दाव्यांची चिरफाड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 7:31 PM