ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २६ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी येणा-या पाकिस्तान तपास पथकाला 7 दिवसांचा व्हिसा देण्यात आला आहे. रविवारी हे पथक भारतात दाखल होणार आहे. पाकिस्तान तपास पथकाच्या मदतीने दहशतवाही हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यास मदत होईल अशी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) अपेक्षा आहे.
पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना अटक करण्यात आली आहे.
इस्लामाबाद आपल्याकडे असेलली माहिती पुरवेल तसंच हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांची आणि जैश-ए-मोहम्मदच्या सहभागी दहशतवाद्यांची ओळख पटवण्यास मदत करेल अशी राष्ट्रीय तपास यंत्रणेला आशा आहे. गेल्या आठवड्यात एनआयएने हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे फोटो आपल्या वेबसाईटवर टाकत लोकांना पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन केले होते. माहिती देणा-यास एक लाखांचे बक्षीसदेखील जाहीर करण्यात आले होते.
पंजाब पोलीस महानिरीक्षक सलविंदर सिंग यांची नव्याने पुन्हा चौकशी करण्यात येणार असून एनआयएने शुक्रवारी समन्स पाठवले आहे. पाकिस्तान तपास पथकाच्या समोर एनआयए पुन्हा एकदा चौकशी करणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या तपास पथकात पाच जणांचा समावेश असणार आहे. रविवारी हे पथक भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान तपास पथक आणि एनआयएमध्ये चर्चा होणार आहे ज्यामध्ये एकमेकांना प्रश्न विचारले जातील. एनआयए पाकिस्तानी तपास यंत्रणांनी दिलेली माहिती आपल्या तपासाशी जुळवून पाहणार आहे. त्यानंतर 29 मार्चला पाकिस्तान तपास पथकाला पठाणकोटमधील दहशतवाही हल्ल्याच्या ठिकाणी घेऊन जाण्यात येणार आहे.