नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानच्या बालकोट भागात एअर स्ट्राईक करण्यात आलं. मात्र या स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून गेल्या दिड महिन्यांमध्ये तब्बल 513 वेळा भारतीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय लष्कराने जशास तसं उत्तर दिल्याने भारताच्या तुलनेत पाकिस्तानचं पाचपटीने अधिक नुकसान झाल्याचं भारतीय लष्कराकडून सांगण्यात येतंय.
व्हाइट नाइट कोरचे जनरल अधिकारी लेफ्टनंट परमजीत सिंह यांनी राजौरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, पाकिस्तानकडून गेल्या दिड महिन्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना 100 पेक्षा अधिक मोर्टार आणि तोफांसारख्या हत्यारांचा वापर करण्यात आला आहे. विशेषकरुन पाकिस्ताने भारतातील मानवी वस्त्यांना टार्गेट केलं आहे. भारतीय लष्करानेही पाकिस्तानी सेनेच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मागील दिड महिन्यात तब्बल 513 वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं आहे. शुक्रवारीच पुंछ सेक्टर भागात दोन मुलींसह चार लष्करी जवान गोळीबारीत जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानही आक्रमक उत्तर देत आहेत. भारतीय सैन्यांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं सर्वाधिक नुकसान झालं असून त्यांच्याकडून सत्य लपवलं जात आहे. मात्र भारतीय लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानचे पाचपटीने अधिक नुकसान झालं आहे अशी माहिती लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह यांनी दिली.
श्रीनगर हायवेवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेड अलर्ट केला जारी
पाकिस्तानच्या बालकोट भागात भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी एअर स्ट्राईक करत जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबारात 4 जवानांसह 10 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 45 जण जखमी आहे. मात्र भारतीय लष्कराचे मनोबल वाढलेलं आहेत. जोपर्यंत सीमेवर भारतीय जवान तैनात आहेत तोवर देशातील नागरिकांनी कोणतीच चिंता बाळगू नका असं आवाहन भारतीय लष्कराकडून करण्यात आलं आहे. आमच्याकडे सर्व प्रकारची हत्यारं आणि विस्फोटक तयार आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. असा विश्वास लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह यांनी देशवासियांना दिला.